झोपणे हह शरीराचा तो कालावधी असतो जेव्हा दिवसभरातील थकवा, ताण, विचारांची धावपळ यापासून शरीर जरा दूर जाण्याचा प्रयत्न करते. सोप्या भाषेत शरीर झोपेत रीसेट होते. पण झोप पूर्ण होत नसेल, किंवा झोपेत खंड पडत असेल, तर त्याचे परिणामी फक्त थकवाच जाणवतो असे नाही. त्याचे इतरही परिणाम दिसून येतात. अनेक सूक्ष्म संकेत शरीर आपल्याला देत असते, जे पुढे मोठ्या समस्यांचे कारण ठरु शकतात. झोपेची कमतरता ही केवळ अस्वस्थता नसून संपूर्ण आरोग्यावर परिणाम करणारी गंभीर बाब आहे.
सुरुवातीला शरीर हलके वाटणे, डोळे जड होणे, लक्ष केंद्रित न होणे किंवा सकाळी ताजेतवाने न वाटणे असे साधे संकेत देते. पण झोपेची कमतरता दीर्घकाळ राहिली तर त्याचे परिणाम खोलवर दिसू लागतात. सर्वप्रथम पचनावर याचा मोठा ताण येतो. शरीर जेवण योग्यरीत्या पचवू शकत नाही, त्यामुळे काही लोकांचे वजन अचानक वाढते तर काहींचे वजन कमी होऊ लागते. हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे भूक वाढणे, गोड पदार्थ खाण्याची इच्छा वाढणे किंवा उलट भूक न लागणे असे टोकाचे बदलही दिसतात.
झोप नीट न झाल्याचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे मनःस्थितीवर होणारा परिणाम. भावनिक संतुलन राखण्यासाठी मेंदूला विश्रांती आवश्यक असते. झोप कमी झाल्यास राग पटकन येणे, छोट्या गोष्टींमुळेही वाईट वाटते, चिडचिड वाढणे, कधी कधी कारण नसताना उदास वाटणे हे सर्व भावनिक अस्थिरतेचे संकेत असतात. मानसिक ऊर्जा कमी पडते आणि दिवसभर मन भारावलेले किंवा ओढून ताणून काम करावे लागते.
याहूनही गंभीर संकेत म्हणजे विसरण्याची सवय वाढणे. मेंदू दिवसभरातील माहिती झोपेत व्यवस्थित साठवतो व मांडतो. झोप कमी असल्यास हा क्रम बिघडतो. त्यामुळे अलीकडच्या घटना विसरणे, कामाच्या छोट्या गोष्टी न आठवणे किंवा सतत एकाग्रता ढासाळल्यामुळे कामात सारख्या चुका होणे असे प्रकार घडतात. काही वेळा संभाषण करताना अचानक स्तब्ध होणे, पुढचे वाक्य आठवतच नाही किंवा विचारांची गाडी थोड्या क्षणासाठी थांबते हीसुद्धा झोपेचा अभाव असल्याची चिन्हे आहेत.
शरीरात ऊर्जा कमी असल्यामुळे स्नायूंमध्ये शिथिलता जाणवते, डोळे सतत मोठे करुन पाहावे लागते, त्वचा निस्तेज दिसणे, आणि लहानसहान आजार पटकन होणे हे देखील झोप अपुरी झाल्यामुळे होणारे दुष्परिणाम आहेत. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती झोपेत मजबूत होते, त्यामुळे अपुरी झोप म्हणजे संरक्षण कवच कमकुवत करणारी बाब आहे. झोप ही मूलभूत गरज आहे आणि ती पूर्ण व्हायलाच हवी.
