आपण सर्वजण आपल्या स्वयंपाकघरात स्पंज किंवा स्क्रबर वापरतो. जर्म्स, व्हायरस किंवा बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी स्वयंपाकघर नियमितपणे स्पंज किंवा स्क्रबने स्वच्छ केलं जातं. भांडी स्वच्छ करणे असो, मसाल्यांचे डबे असोत किंवा गॅस असो... बहुतेक घरांमध्ये स्पंज किंवा स्क्रबचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का? की जर डिशवॉशिंग स्पंज जास्त काळ वापरला गेला तर त्यामुळे अनेक धोकादायक आजार होऊ शकतात. हे आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.
स्वयंपाकघरातील स्पंज का असतात धोकादायक?
२०१७ मध्ये जर्मनीतील फर्टवांगेन विद्यापीठात स्पंज आणि स्क्रबवर एक रिसर्च करण्यात आला. त्यानुसार, आपल्या स्वयंपाकघरातील स्क्रब आणि स्पंजमध्ये टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असू शकतात, ज्यामुळे गंभीर आजार होण्याचा धोका आहे. बहुतेक घरांमध्ये दिवसातून किमान २-३ वेळा स्पंज किंवा स्क्रब वापरला जातो. ज्यामुळे तो सुकण्यास वेळ मिळत नाही आणि ओला राहतो. ओलाव्यामुळे त्यात हानिकारक बॅक्टेरिया वाढतात. जेव्हा अन्नाचे छोटे कण स्पंज किंवा स्क्रबच्या आतील भागात बराच काळ अडकून राहतात तेव्हा या बॅक्टेरियाचा धोका वाढतो.
स्पंजमध्ये कोणत्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात?
- साल्मोनेला
- ई. कोली
- स्टेफिलोकोकस
स्पंज-स्क्रबरचा जास्त काळ वापर केल्याने कोणते आजार होऊ शकतात?
- स्पंज-स्क्रबरमध्ये असलेले साल्मोनेला, ई. कोली किंवा स्टॅफिलोकोकस सारखे बॅक्टेरिया फूड पॉयझनिंगचा धोका वाढवतात.
- पोटाच्या समस्या निर्माण होतात.
- घाणेरड्या स्पंजला स्पर्श केल्याने त्वचेवर जळजळ, पुरळ किंवा फंगल इन्फेक्शन होऊ शकतं.
- उलट्या किंवा अतिसार.
- ताप.
- श्वसनाच्या समस्या.
स्वयंपाकघरातील स्पंज कधी बदलावा?
बॅक्टेरिया रोखण्यासाठी स्वयंपाकघरातील स्पंज नियमितपणे स्वच्छ करावेत. ते स्वयंपाकघरातील ओलसर ठिकाणांपासून दूर ठेवावे. स्पंज वाळवल्याने त्यावर असलेले साल्मोनेला बॅक्टेरिया कमी होऊ शकतात. तज्ञांच्या मते, स्वयंपाकघरातील स्पंज दर दोन ते तीन आठवड्यांनी बदलला पाहिजे. तुम्ही स्पंजचा किती वेळा वापर करता यावर ते खासकरून अवलंबून आहे.