सांधेदुखी ही केवळ वय वाढल्यावरच होते, असे नाही. आजकाल अनेक महिलांना कमी वयातही सांध्यांमध्ये वेदना, कडकपणा आणि हालचालींमध्ये त्रास जाणवतो. कामाचा ताण, बदलती जीवनशैली आणि शरीरातील काही महत्त्वाचे बदल यामुळे महिलांमध्ये सांधेदुखीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. महिलांमध्ये सांधेदुखी वाढण्यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे हार्मोनल बदल. विशेषतः वयानुसार किंवा प्रसूतीनंतर शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होते, ज्याचा थेट परिणाम हाडं आणि सांध्यांवर होतो. त्यामुळे सांधे कमकुवत होतात आणि वेदना जाणवू लागतात.
दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कॅल्शियम आणि व्हिटामिन डी ची कमतरता. अनेक महिलांच्या आहारात या पोषक घटकांची कमतरता असते, ज्यामुळे हाडं ठिसूळ होतात आणि सांध्यांमध्ये वेदना वाढतात. विशेषतः सूर्यप्रकाश कमी मिळणं यामागे कारणीभूत ठरतं. याशिवाय, सतत बसून राहण्याची सवय, व्यायामाचा अभाव आणि वाढतं वजन हे ही सांधेदुखीचं मोठं कारण आहे. शरीराची हालचाल कमी झाल्यास सांधे कडक होतात आणि त्यांची लवचिकता कमी होते. त्यामुळे उठताना, बसताना किंवा चालताना त्रास होतो.
काही वेळा चुकीची बसण्याची पद्धत, उंच टाचेच्या चपल (हाय हील्स) वापरणं किंवा जास्त वेळ उभं राहणं यामुळेही सांध्यांवर ताण येतो आणि वेदना वाढतात. घरकाम किंवा ऑफिसचं काम करताना चुकीच्या सिटींग अॅरेंजमेंट्स किंवा पोश्चरमुळे हा त्रास अधिक वाढू शकतो. तसंच, वाढतं वय आणि सांध्यांमधील कॅर्टिलेज (cartilage) झिजणं हे ही नैसर्गिक कारण आहे. त्यामुळे गुडघे, कंबर, मान या भागांमध्ये वेदना जाणवू लागतात. सांधेदुखी कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनशैलीत बदल करणं. दररोज हलका व्यायाम, चालणं किंवा योगा केल्याने सांधे लवचिक राहतात आणि वेदना कमी होतात. विशेषतः स्ट्रेचिंग एक्सरसाइज खूप फायदेशीर ठरतात.
आहारात कॅल्शियम आणि व्हिटामिन डी यांचा पुरेसा समावेश करणं गरजेचं आहे. दूध, दही, पनीर, तीळ, बदाम यांसारखे पदार्थ हाडांसाठी उपयुक्त ठरतात. सकाळच्या उन्हात काही वेळ बसणंही शरीरासाठी फायदेशीर आहे. वजन नियंत्रणात ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जास्त वजनामुळे सांध्यांवर ताण येतो, त्यामुळे वेदना वाढतात. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यामुळे वजन नियंत्रणात राहू शकतं. गरम पाण्याचा शेक आणि वेळीच तज्ज्ञांचा घेतलेला सल्ला महत्वाचा आहे.
Web Summary : Early joint pain in women is rising due to hormonal changes, vitamin deficiencies, and lifestyle factors. Prevention includes regular exercise, a calcium and vitamin D-rich diet, weight management, and proper posture. Consulting experts and using warm compresses also helps alleviate pain.
Web Summary : महिलाओं में कम उम्र में जोड़ों का दर्द हार्मोनल बदलाव, विटामिन की कमी और जीवनशैली के कारण बढ़ रहा है। रोकथाम के लिए नियमित व्यायाम, कैल्शियम और विटामिन डी युक्त आहार, वजन प्रबंधन और सही मुद्रा अपनाएं। विशेषज्ञों से सलाह और गर्म सेंक भी दर्द से राहत दिलाते हैं।