नाक सतत वाहत राहणे आणि सर्दी लवकर बरी न होणे ही अनेकांची रोजची तक्रार असते. साधी सर्दी काही दिवसांत बरी व्हायला हवी, पण काही वेळा ती महिनाभर टिकते. यामागे केवळ थंडी किंवा व्हायरलच नाही, तर शरीराशी आणि वातावरणाशी संबंधित अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. सतत वाहणाऱ्या नाकामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे अॅलर्जी. धूळ, माती, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस, बुरशी किंवा तीव्र वास यामुळे अॅलर्जिक राइनायटिस होतो. अशा वेळी नाकातून पाणी येते, शिंका येतात आणि डोळेही पाणावतात, पण ताप किंवा अंगदुखी सहसा नसते. काही लोकांमध्ये ऋतू बदलताना ही समस्या अधिक वाढते.
कधी-कधी सर्दी व्हायरल संसर्गामुळे सुरु होते, पण योग्य विश्रांती न घेतल्यास किंवा सतत थंड पदार्थ खाल्ल्यास ती पूर्णपणे बरी होत नाही. वारंवार एसीमध्ये बसणे, थंड हवेत अचानक जाणे किंवा ओले कपडे घालणे यामुळे नाकातील श्लेष्मल त्वचा अधिक संवेदनशील होते आणि नाक वाहत राहते. नाकाच्या आतल्या रचनेशी संबंधित समस्या देखील कारणीभूत ठरु शकतात. नाकाची हाडे वाकडी असणे (डेव्हिएटेड सेप्टम), सायनसची सूज किंवा नाकात वाढलेले मांस (नॅझल पॉलिप्स) असल्यास सर्दी सारखी लक्षणे कायम राहतात. अशा वेळी नाक बंद होणे, डोके दुखणे आणि चेहऱ्यावर जडपणा जाणवतो. कमकुवत रोगप्रतिकारशक्ती हेही एक मोठे कारण आहे. सतत ताणतणाव, अपुरी झोप, असंतुलित आहार, जीवनसत्त्वांची कमतरता यामुळे शरीर व्हायरस आणि अॅलर्जीशी नीट लढू शकत नाही. त्यामुळे साधी सर्दीही दीर्घकाळ टिकते.
या समस्येवर उपाय करताना आधी कारण ओळखणे महत्त्वाचे आहे. घरगुती उपायांमध्ये कोमट पाण्याची वाफ घेणे फार उपयोगी ठरते. वाफेमुळे नाकातील मार्ग मोकळे होतात आणि साचलेला कफ बाहेर पडण्यास मदत होते. कोमट मिठाच्या पाण्याने नाक धुणे (नॅझल वॉश) केल्यास सर्दी कमी होते. आहारात गरम सूप, आले, तुळस, काळी मिरी, हळद यांचा समावेश केल्यास सूज कमी होण्यास मदत होते. भरपूर कोमट पाणी पिणे आवश्यक आहे, त्यामुळे कफ पातळ होतो. थंड पदार्थ, आइस्क्रीम, फ्रिजमधले पाणी आणि फार थंड पेये टाळावीत.
झोपेची वेळ नीट पाळणे आणि ताण कमी ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. खोली स्वच्छ ठेवणे, धूळ साचू न देणे आणि अॅलर्जी निर्माण करणाऱ्या घटकांपासून दूर राहणे उपयुक्त ठरते. बाहेरुन आल्यावर चेहरा आणि नाक स्वच्छ धुणे ही सवय लावून घ्यावी. जर सर्दी आठवड्याभराहून जास्त टिकत असेल, नाकातून हिरवट किंवा पिवळा स्राव येत असेल, डोकेदुखी, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. काही वेळा औषधोपचार किंवा तपासणीशिवाय ही समस्या सुटत नाही.
