Diabets : भारतीय जेवण हे भरपूर पोषक मानलं जातं. कारण आपल्या जेवणाच्या ताटातील पदार्थांमधून आपल्याला व्हिटामिन्स, मिनरल्स असे अनेक पोषक तत्व मिळतात. पण अलिकडेच इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) च्या अहवालात एक काळजी करण्यासारखी बाब समोर आली आहे. या नव्या अहवालानुसार, आपल्या ताटातील पदार्थ हे आपलं आरोग्य बिघडवण्यास हातभार लावत आहेत.
नेचर मेडिसिनमध्ये प्रकाशित या संशोधनात आढळलं आहे की, सरासरी भारतीय आहारात कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप जास्त आहे. साधारण 62% कॅलरीज दररोज कार्बोहायड्रेटमधून मिळतात. तर प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सचे प्रमाण चिंताजनक कमी आहे. या असंतुलनामुळे देशभरात डायबिटीस, प्रीडायबिटीज आणि लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असल्याचा इशारा या अभ्यासात देण्यात आला आहे.
अभ्यासानुसार भारतीय आहारातील सुमारे 62% दररोजच्या कॅलरीज कार्बोहायड्रेटमधून येतात, जे प्रमाण जागतिक पातळीवर खूप जास्त आहे. हे कार्बोहायड्रेट मुख्यपणे पांढरा तांदूळ, पिठाचे पदार्थ आणि साखर यांमधून मिळतात.
देशाच्या विविध भागांमध्ये फरक
दक्षिण, पूर्व आणि ईशान्य भारतात पांढऱ्या तांदळाचे प्रमाण सर्वाधिक आहे. उत्तर आणि मध्य भारतात गव्हाचे वर्चस्व आहे. तर बाजरी केवळ काही राज्यांमध्ये (उदा. कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र) आहाराचा भाग आहे.संसोधन सांगतं की, जास्त
कार्बोहायड्रेटयुक्त आहारामुळे टाइप-2 डायबिटीस, प्रीडायबिटीस आणि पोटावरील चरबी वाढण्याचा धोका 15–30% पर्यंत वाढतो.
कसा असावा संतुलित आहार?
ICMR च्या या अहवालातून हे स्पष्ट होतं की, आपल्या आहारात बदल करणे अत्यावश्यक आहे. संतुलित आणि पौष्टिक आहारासाठी खालील अन्नपदार्थांचा समावेश करता येऊ शकतो.
ड्राय फ्रूट्स आणि बिया - बदाम, अक्रोड, अळशी, चिया सीड्स प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सचे उत्तम स्रोत असतात.
ग्रीक दही किंवा साधे दही - गट हेल्थसाठी फायदेशीर, प्रोटीन आणि प्रोबायोटिक्सयुक्त.
डाळी आणि कडधान्ये - मसूर, हरभरा, राजमा, मूग बेस्ट प्लांट प्रोटीन स्रोत.
पनीर - कॅल्शियम आणि केसिन प्रोटीनयुक्त; भाज्यांसोबत उत्तम संतुलित पर्याय.
सोया आणि टोफू - प्रोटीनयुक्त आणि कार्बोहायड्रेटमध्ये कमी; शाकाहारींसाठी उत्तम पर्याय.
हेल्दी भारतासाठी आवश्यक आहे की आपल्या ताटात कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्सचे योग्य संतुलन असावं. लहान पण नियमित बदल दीर्घकाळात मोठा फरक घडवू शकतात.