एखादी भरलेली पाण्याची बाटली उचलली, बॅग हातात घेतली किंवा व्यायामाच्या वेळी थोडेसे वजन उचलले, तरी मनगटात वेदना जाणवते का? अनेकांना ही समस्या जाणवते आणि ती सुरुवातीला किरकोळ वाटली तरी, हळूहळू ती गंभीर स्वरुप धारण करु शकते. (How strong is your wrist? Many people have started to experience pain in their wrists - the pain of carpal tunnel syndrome, see what it means..)मनगट हे आपल्या हातातील सर्वाधिक वापरले जाणारे सांधे आहेत. टायपिंग, मोबाइल वापरणे, स्वयंपाक करणे, वजन उचलणे या सगळ्या हालचालींमध्ये मनगट सतत कार्यरत असते. त्यामुळे थोडासाही ताण किंवा चुकीचा वापर झाला, तरी वेदना जाणवू लागते.
मनगट दुखण्याची अनेक कारणे असतात. काही वेळा सततची हालचाल केल्यामुळे मनगटातील स्नायूंना आणि टेंडनना सूज येते. याला 'टेंडनायटिस' असे म्हणतात. तर काही वेळा मनगटातील नसांवर दाब आल्यामुळे कार्पल टनेल सिंड्रोम होतो, ज्यामुळे हात सुन्न पडणे, मुंग्या येणे आणि झिणझिण्या जाणवणे अशी लक्षणे दिसतात. कधी अचानक वजन घेतल्याने मनगट वळते किंवा ताणले जाते, त्यातून स्प्रेन किंवा स्ट्रेन होते. वय वाढल्यावर संधिवातही मनगटातील हाडांवर परिणाम करतो आणि जर शरीरात कॅल्शियम किंवा जीवनसत्त्व 'डी'ची कमतरता असेल, तर हाडे कमकुवत होऊन थोड्याशा प्रयत्नानेही दुखतात. अशा वेदनेसोबत अनेकदा हाताला सतत सुज येते, हालचाली करताना हाडातून आवाज येतो, बोटांमध्ये झिणझिण्या येतात आणि सकाळी हात आखडलेला जाणवतो तर याकडे दुर्लक्ष करु नका.
उपाय म्हणून सर्वप्रथम आराम देणे गरजेचे आहे. सततच्या हालचाली थांबवा आणि मनगटाला विश्रांती द्या. ताज्या दुखापतीसाठी थंड शेक, तर जुन्या वेदनेसाठी गरम शेक उपयुक्त ठरतो. काही वेळा मनगट पट्टी (wrist brace) वापरणेही मदत करते. हलक्या हातांनी मनगट फिरवणे, स्ट्रेस बॉलचा वापर करणे असे साधे व्यायाम दररोज केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि वेदना कमी होते.
आहारात कॅल्शियम, जीवनसत्त्व डी आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स युक्त पदार्थांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. दूध, बदाम आणि हिरव्या भाज्या यामुळे हाडे मजबूत राहतात. तसेच संगणकावर काम करताना मनगट नैसर्गिक स्थितीत ठेवणे, मोबाइलचा वापर मर्यादित करणे आणि दर तासाला हात स्ट्रेच करणे हेही महत्त्वाचे आहे. जर वेदना काही दिवसांत कमी झाली नाही, सुज वाढली किंवा हात सुन्न पडू लागला, तर ऑर्थोपेडिक किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
