प्रत्येक घरात दररोज बेडशीटचा वापर केला जातो, परंतु लोक त्याच्या स्वच्छतेबाबत अनेकदा निष्काळजी असतात. बेडशीट ही केवळ घर सजावटीचा एक भाग नाही तर ती तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेच्या काळजीसाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावत असते. जर बेडशीट वेळोवेळी स्वच्छ केली नाही तर त्यामुळे अनेक प्रकारचं स्किन इंफेक्शन आणि ऍलर्जी होऊ शकते.
बेडशीटची नियमित स्वच्छता केल्याने तुमची त्वचा चांगली राहते, नीट झोप लागते आणि आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते. तुम्ही जर बेडशीट बदलायला कंटाळा करत असाल तर ही सवय आताच बदला आणि आपल्यासह कुटुंबीयांचं आरोग्य सांभाळा. स्वच्छ, सुंदर बेडशीटमुळे निरोगी राहाल आणि मनाला देखील प्रसन्न वाटेल.
बेडशीट किती दिवसांनी बदलावी?
तज्ज्ञांच्या मते, दर ७ दिवसांनी बेडशीट बदलल्या पाहिजेत. जर तुम्ही धूळ, घाण किंवा घामाने भरलेल्या वातावरणात काम करत असाल तर बेडशीट ३-४ दिवसांत बदलणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात घामामुळे बेडशीटवर बॅक्टेरिया आणि फंगस वेगाने वाढू शकतात. त्याच वेळी, हिवाळ्यातही धूळ आणि डेड स्कीन जमा होण्याची शक्यता असते.
बेडशीट खराब असल्यास काय होतं नुकसान?
घाणेरड्या बेडशीटमध्ये बॅक्टेरिया आणि फंगस जमा होतात, ज्यामुळे स्किन इंफेक्शन, खाज आणि पुरळ येऊ शकतात. धूळ आणि घाणीने भरलेल्या बेडशीट्समुळे अॅलर्जी आणि दमा यांसारखे श्वसनाचे आजार वाढू शकतात. आरामदायी झोपेसाठी स्वच्छ बेडशीट्स आवश्यक आहेत. घाणेरडे आणि दुर्गंधीयुक्त बेडशीट झोपेत अडथळा आणू शकतात.
बेडशीट कधी धुवावी?
बेडशीट आणि उशांचे कव्हर हे घरातील धूळ किंवा काही कारणाने खराब होतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी ते नक्की धुवावेत.
बेडशीट्स अशा करा स्वच्छ
बेडशीट धुण्यासाठी सौम्य डिटर्जंट वापरा आणि दर आठवड्याला ती धुवा. बॅक्टेरिया आणि फंगस पूर्णपणे नष्ट होण्यासाठी गरम पाणी वापरा. त्या उन्हात वाळवल्याने त्यातील बॅक्टेरिया आणि दुर्गंधी दूर होते. प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळ्या बेडशीट्स वापरा. उन्हाळ्यात हलक्या आणि सुती कापडाच्या बेडशीट्स निवडा आणि हिवाळ्यात जाड आणि उबदार कापडाच्या बेडशीट्स निवडा. बेडशीट्ससोबतच उशांचे कव्हर आणि ब्लँकेटची स्वच्छता देखील महत्त्वाची आहे. आठवड्यातून एकदा तरी आठवणीने धुवा.