तुळस ही पवित्र मानली जाणारी वनस्पती आहे. ती फक्त धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची नाही, तर त्याचे अनेक औषधी फायदेही आहेत.(holy basil leaves are a boon for health!! very effective remedy, use it like this) तुळशीच्या पानांत जंतूनाशक, विषाणूनाशक, दाहशामक, अँण्टी ऑक्सिडंट्स आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुण असतात. त्यामुळे तुळस खाणे आणि तुळस त्वचेवर लावणे दोन्ही कृती फायद्याच्या ठरतात.
तुळशीच्या पानांचा लेप त्वचेवरील विकारांवर खास परिणामकारक मानला जातो. त्वचेवर वारंवार येणारे फोड, पुरळ, खाज किंवा किड्यांमुळे होणारी अॅलर्जी यावर तुळशीची पाने लावणे एकदम प्रभावी ठरते. ही पाने वाटून लावल्यास सूज कमी होते आणि त्वचेला थंडावा मिळतो. जखमा लवकर भरव्या आणि त्यावर संसर्ग होऊ नये यासाठीही तुळशीचा लेप उपयुक्त आहे. उन्हामुळे त्वचा लालसर झाली असेल किंवा अॅलर्जीमुळे त्रास होत असेल तर तुळशीच्या पानांचा लेप लावल्याने आराम मिळतो.
तुळशीच्या पानांचा काढा हा घरगुती औषधांमध्ये सर्वात प्रभावी मानला जातो. सर्दी, खोकला, ताप, घशाची खवखव यांसाठी तुळशीचा काढा घेतल्यास लवकर बरे वाटते. श्वसनमार्गातील अडथळे दूर करण्याची क्षमता तुळशीमध्ये असल्याने दमा किंवा श्वसनासंबंधी समस्या असणार्यांसाठी हा काढा उपयुक्त ठरतो. पचनशक्ती कमी असलेल्यांनी तुळशीचा काढा घेतल्यास भूक सुधारते आणि पचनाचे त्रास कमी होतात. शरीराला उब मिळावी यासाठी तुळशी, आलं, काळी मिरी असा काढा घेतला जातो.
तुळशीचे आणखी काही महत्त्वाचे फायदे म्हणजे ती रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. सतत बदलत्या हवामानात किंवा वारंवार आजारी पडणार्यांनी तुळशीचा नियमित वापर केला तर शरीराला आजारांशी लढण्याची ताकद मिळते. तुळशीतील अँण्टी ऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्सचा नाश करतात आणि पेशींचे रक्षण करतात.
याशिवाय तुळशी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, कोलेस्टेरॉल कमी करण्यास उपयोगी ठरते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राखते. पोटदुखी, डोकेदुखी किंवा मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठीही तुळशीचा उपयोग केला जातो. तिच्या सुगंधामुळे वातावरण शुद्ध होते आणि मनाला प्रसन्नता मिळते.