होळीचा हा रंगांचा सण आहे. मात्र याच दरम्यान डोळ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. रंगांमध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात, ज्यामुळे डोळ्यांचं गंभीर नुकसान होऊ शकतं. याशिवाय डोळ्यांना हानी पोहोचवणाऱ्या इतरही अनेक गोष्टी आहेत. होळीच्या वेळी डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काय करायचं ते जाणून घेऊया.
होळी खेळताना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?
- होळीच्या वेळी स्वस्त आणि केमिकलयुक्त रंगांचा वापर टाळावा, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यामुळे डोळ्यांची जळजळ आणि एलर्जी होऊ शकते. नेहमी चांगल्या क्वालिटीचे ऑर्गेनिक आणि हर्बल रंग वापरा.
- काही लोक सिल्व्हर पेंट किंवा इतर रंगांनी होळी खेळतात, जे डोळ्यांसाठी अत्यंत धोकादायक असू शकतं. डोळ्यांच्या कॉर्नियाचं नुकसान होऊ शकतं.
- होळी खेळण्यापूर्वी, तुमच्या चेहऱ्यावर आणि त्वचेवर मॉइश्चरायझर किंवा नारळाचं तेल लावा. यामुळे रंग त्वचेला आणि डोळ्यांना कमी चिकटतात आणि सहज स्वच्छ होतात.
- होळी खेळताना, रंग आणि पाण्यापासून तुमचे डोळे वाचवण्यासाठी नेहमी सनग्लासेस किंवा चष्मा घाला.
- फुगे फेकून होळी खेळणं हे धोकादायकच नाही तर यामुळे डोळ्यांना दुखापत देखील होऊ शकते. हातांनी रंग लावा.
- कॉन्टॅक्ट लेन्स घालून होळी खेळण्याची चूक करू नका. जर रंग तुमच्या डोळ्यात गेला तर डोळे चोळणं टाळा.