हिवाळ्यातल्या थंडीचा कहर सध्या चांगलाच वाढलेला आहे. एरवी उष्ण असणारी कित्येक शहरं आता मात्र अगदी हिल स्टेशन झाली आहेत. वातावरणातला वाढलेला गारवा बऱ्याच जणांना सहन होत नाही. त्यामुळे मग सर्दी, खोकला, कफ असे त्रास सुरू होतात. हा त्रास जाता जात नाही. औषधं घेऊनही वैताग येऊन जातो. म्हणूनच आता सर्दी, खोकला कमी करण्यासाठी एका खास पद्धतीने हर्बल चहा किंवा काढा करून प्या. हा चहा तुम्ही २ ते ३ दिवस दिवसांतून दोनदा घ्या. खूप लवकर आराम मिळेल (Herbal Tea to Get Relief From Cold and Cough). सर्दी, खोकला, जुनाट कफ मोकळा होऊन लगेच बरं वाटेल.(home remedies by Ramdev baba for cold and cough)
सर्दी- खोकला कमी करण्यासाठी हर्बल चहा रेसिपी
सर्दी, खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी हर्बल चहा कसा करायचा याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ रामदेव बाबा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
यासाठी एका पातेल्यामध्ये १ ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये १ टीस्पून ज्येष्ठमध पावडर आणि १ टीस्पून दालचिनी पावडर घाला. दालचिनी शरीर उबदार ठेवण्यासाठी मदत करते तर ज्येष्ठमध घशाला आराम देतो. खोकला कमी करतो.
यानंतर तुळशीची ७ ते ८ पानं हातानेच थोडी कुस्करून घ्या आणि नंतर ती पाण्यामध्ये टाका. यानंतर त्यामध्ये केशराच्या ४ ते ५ काड्या घाला. आता हे पाणी गॅसवर गरम करायला ठेवा.
७ ते ८ मिनिटे पाण्याला चांगली उकळी येऊ द्या आणि त्यानंतर ते पाणी गाळून घ्या. आता हे पाणी गरम गरम पिऊन घ्या. रात्री झोपण्यापुर्वी हा काढा प्यायला तरी चालेल..
या काढ्यामध्ये थोडं किसलेलं आलं तसेच ३ ते ४ लवंग आणि ३ ते ४ मिरे बारीक कुटून घातले तरी चालते. कारण या तिन्ही गोष्टी सर्दी, खोकला, कफ कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. काही केल्या सर्दीचा त्रास कमीच होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक उत्तम.
