High BP In Children : हाय बीपी ही समस्या सामान्यपणे वय जास्त झालेल्या लोकांचा आजार मानला जात होता. पण अलिकडे हाय बीपीची समस्या तरुणांनाही छळू लागली आहे. हे कमीच म्हणून आता ७-८ वर्षाच्या मुलांनाही होतोय हायबीपीचा त्रास. आहे. अलिकडेच करण्यात आलेल्या एका संशोधनात आढळून आलं आहे की, वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी ब्लड प्रेशर वाढल्यास पुढील आयुष्यात म्हणजे साधारण पन्नाशीत प्रवेश करण्याआधीच, हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका अधिक वाढतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या हायपरटेन्शन सायंटिफिक सेशन्स 2025 मध्ये हे संशोधन सादर करण्यात आलं असून हे संशोधन JAMA जर्नलमध्येही प्रकाशित झाले आहे.
या संशोधनात प्रथमच लहान वयात (७ वर्षांच्या मुलांमध्ये) ब्लड प्रेशरचा परिणाम तपासण्यात आला. याआधीच्या अभ्यासांमध्ये १२ वर्षे वयाच्या मुलांमध्ये आढळणारा हाय बीपी पुढे जाऊन हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका वाढवतो, असं आढळून आलं होतं. मात्र, आता या नव्या निष्कर्षांनुसार हा धोका त्याहीपेक्षा लवकर म्हणजेच सातव्या वर्षापासूनच सुरू होतो. संशोधकांच्या मते, भारतासाठी ही बाब अधिक चिंतेची आहे. कारण, येथील अभ्यासांनुसार मुलांमध्ये हाय ब्लड प्रेशरचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
२०२१ मध्ये केलेल्या ६४ अभ्यासात असे आढळले की, सुमारे ७% भारतीय मुले व किशोरवयीन मुलांना हाय बीपीचा त्रास आहे. २००५ नंतर हे प्रमाण अधिक वेगानं वाढलं आहे. खासकरून शहरी भागांमध्ये हा धोका जास्त असल्याचं आढळून आलं. त्यातही जाड मुलांमध्ये हा धोका अधिक आहे. सामान्य वजनाच्या मुलांमध्ये ७% असलेला धोका, जाड मुलांमध्ये तो २९% इतका आढळला.
कार्डिओथोरॅसिक आणि कार्डिओव्हस्क्युलर सर्जरी तज्ज्ञ डॉ. मुकेश गोयल सांगतात की, “लहान मुलांमध्ये बीपीची तपासणी प्रामुख्याने ‘opportunistic’ पद्धतीने केली जाते. म्हणजे मुलं लठ्ठ असतील, कौटुंबिक इतिहास असेल किंवा इतर समस्या असेल तरच बीपी तपासले जाते. याबाबत भारतात नियमित स्क्रिनिंग अजूनही प्रचलित नाही.”
मुलांना बीपीचा त्रास होण्याची कारणं..
- लहान मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या paediatric BP cuffs यांची कमतरत
- योग्य प्रशिक्षणाची उणीव. त्यामुळे होणारं दुर्लक्ष
- प्राथमिक आरोग्यसेवेत इतर प्राधान्यांमुळे मुलांच्या ब्लड प्रेशर तपासणीवर कमी लक्ष
- अभ्यासाचा वाढलेला ताण
- स्क्रीन टाईम म्हणजेच मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर अधिक बघणे
- शारीरिक हालचाल कमी करणे
- जंक फूड, फास्ट फूड, प्रोसेस्ड फूड, जास्त मीठ व साखर खाणे
- झोप कमी घेणे आणि त्यामुळे आलेला तणाव.
म्हणजेच, बालपणापासून ब्लड प्रेशर तपासणीची गरज ओळखली जात असली तरी व्यवहारात तिची अंमलबजावणी कमी आढळते आहे, आणि त्यामुळे भविष्यातील हृदयविकारांचा धोका वाढतो.
