'हार्ट अॅटॅक' हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र येते ते म्हणजे, एखादी व्यक्ती अचानक आपली छाती पकडते आणि जमिनीवर कोसळते. चित्रपट आणि जाहिरातींमध्ये हार्ट अॅटॅकचे हेच एक मुख्य लक्षण वारंवार दाखवले जाते. मात्र, प्रत्यक्षात त्याची लक्षणे नेहमीच इतकी स्पष्ट आणि ओळखीची नसतात. हार्ट अॅटॅक (Heart Attack Symptoms) येतो म्हणजे छातीत दुखू लागते यालाच आपण हार्ट अॅटॅकचे मुख्य लक्षण मानतो. परंतु प्रत्येक वेळी हे एकच लक्षण दिसेल असे नाही, हार्ट अॅटॅक येताना तो प्रत्येकवेळीच 'छातीतील तीव्र वेदनां'सह येईलच असे नाही. अनेकवेळा काहींच्या बाबतीत, विशेषतः महिला आणि मधुमेही व्यक्तींमध्ये, शरीरात असे काही सूक्ष्म बदल होतात ज्याकडे आपण 'पित्त झालं असेल' किंवा 'कामाचा थकवा असेल' म्हणून सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. दुर्दैवाने, हीच छोटी चूक जीवावर बेतू शकते.
हार्ट अॅटॅकच्या वेळी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. म्हणूनच, जीव वाचवण्यासाठी केवळ छातीत दुखण्याच्या एका मुख्य लक्षणांवर अवलंबून न राहता, शरीराने दिलेले 'छुपे' संकेत (Heart Attack Symptoms) ओळखणेही तितकेच गरजेचे असते. हार्ट अॅटॅक येताना अनेक रुग्णांच्या बाबतीत, छातीत तीव्र वेदना होतच नाहीत, तर शरीरात इतर काही बदल जाणवतात. जीव वाचवण्यासाठी ही लक्षणे वेळेत ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. आपला जीव वाचवण्यासाठी हार्ट अॅटॅकची लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाय माहीत असणे गरजेचे असते. छातीत वेदना होण्याऐवजी हार्ट अॅटॅकची अशी काही लक्षणे, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो ती कोणती ते पाहूयात...
छातीत वेदना होण्यासोबतच, हार्ट अॅटॅकची इतर प्रमुख लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाय...
१. श्वास घेण्यास त्रास होणे (Shortness of Breath) :- कोणतेही कष्टाचे काम न करता किंवा अगदी विश्रांती घेत असतानाही जर तुम्हाला अचानक धाप लागत असेल, तर हे हृदयविकाराचे गंभीर लक्षण असू शकते. जेव्हा हृदय शरीराच्या इतर भागांकडे सहजपणे रक्त पंप (Blood Pump) करू शकत नाही, तेव्हा फुफ्फुसांवर दाब वाढतो, ज्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. जिने चढताना किंवा चालताना धाप लागते किंवा थकवा जास्त जाणवते. जर झोपल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल आणि बसल्यावर बरे वाटत असेल, तर हे हृदयाच्या कमकुवतपणाचे लक्षण असू शकते.
ऑफिसची खुर्ची झाली दुश्मन-प्रत्येकाच्या मागे पाठीचं दुखणं, ‘ही’ १ चूक जन्मभर पडेल महागात...
२. शरीराच्या इतर भागांत वेदना आणि अस्वस्थता जाणवते :- हार्ट अॅटॅकच्या वेदना फक्त छातीपुरत्याच मर्यादित असतात, हा एक मोठा समज आहे. प्रत्यक्षात, या वेदना अनेकदा खांदे, मान, जबडा, पाठ किंवा हातांमध्ये (विशेषतः डाव्या हातात) जाणवू शकतात. अनेकदा ही कळ छातीतून सुरू होऊन हातांकडे किंवा मानेकडे सरकताना जाणवते. स्त्रियांमध्ये हार्ट अॅटॅकच्या (Heart Attack Symptoms) वेळी पाठीत वेदना होण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त असते. अनेकदा लोक जेव्हा जबडा दुखतो, तेव्हा त्याला साधी 'दातदुखी' समजून डेंटिस्टकडे जाण्याचा विचार करतात किंवा पेनकिलर घेतात. पण लक्षात ठेवा, कोणतीही इजा झालेली नसताना अचानक जबडा किंवा पाठ दुखणे हा हार्ट अॅटॅकचा एक छुपा संकेत असू शकतो.
३. प्रचंड थकवा आणि अशक्तपणा :- जर तुम्हाला मागच्या काही दिवसांपासून कोणत्याही ठोस कारणाशिवाय प्रचंड थकवा जाणवत असेल, तर वेळीच सावध व्हा. विशेषतः स्त्रियांमध्ये, हार्ट अॅटॅक येण्यापूर्वी कित्येक आठवडे आधीपासूनच मोठ्या प्रमाणावर अशक्तपणा जाणवू शकतो. हा थकवा इतका जास्त असतो की, नेहमीची छोटी-मोठी कामे करणे किंवा साधे चालणे-फिरणे देखील कठीण होऊन बसते. जर तुम्हाला पुरेशी झोप घेऊनही सतत थकल्यासारखे वाटत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
४. थंड घाम येणे आणि चक्कर येणे :- कोणत्याही शारीरिक श्रमाशिवाय किंवा उकाडा नसतानाही जर अचानक थंड घाम येत असेल, तर हे आपल्या शरीराने हार्ट अॅटॅक येण्यापूर्वी दाखवलेले प्रमुख लक्षण आहे. जर या घामासोबतच तुम्हाला चक्कर येत असेल किंवा आपण आता बेशुद्ध पडू असं वाटत असेल, तर हे हृदयापर्यंत होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्याचे लक्षण असू शकते.
बिनसाखरेचा चहा बिंधास्त प्यायल्यानेही होते आहे आरोग्याचे नुकसान, डॉक्टर सांगतात, हे एक चुकतं कारण...
५. पोटाच्या तक्रारी आणि मळमळणे :- हार्ट अॅटॅकच्या लक्षणांना अनेकदा लोक साधी 'ॲसिडिटी' (Acidity) किंवा अपचन समजण्याची चूक करतात. पोटाच्या वरच्या भागात दाब जाणवणे, मळमळणे किंवा उलट्या होणे हे देखील हृदयविकाराचे संकेत असू शकतात. जर तुम्हाला वारंवार असा त्रास होत असेल, जो नॉर्मल किंवा पित्ताचे औषध घेऊनही बरा होत नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
