Heart Attack Causes : बहुतेक वेळा असे मानले जाते की हार्ट अॅटॅक किंवा स्ट्रोक अचानक येतो, आधी कोणतीही कल्पना न देता. मात्र एका नव्या आणि मोठ्या आरोग्यासंबंधी अभ्यासाने ही समजूत चुकीची ठरवली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरिया येथील ९० लाखांहून अधिक प्रौढांच्या आरोग्य नोंदींवरआधारित या संशोधनात असे आढळून आले आहे की, हृदयाशी संबंधित गंभीर आजार जवळजवळ कधीच कोणतेही संकेत न देता होत नाहीत.
या अभ्यासानुसार, ज्या लोकांना हार्ट अॅटॅक, स्ट्रोक किंवा हार्ट फेल्युअर झाला, त्यांच्यापैकी जवळजवळ सर्वांमध्ये आधीपासूनच काही सामान्य धोका असतो. हे संशोधन २०२५ मध्ये ‘जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजी’ मध्ये प्रकाशित झाले असून, योग्य वेळी काळजी घेतल्यास या जीवघेण्या आजारांपासून बचाव होऊ शकतो, असे यात स्पष्ट केले आहे.
जोखीम
या अभ्यासात हृदयविकार होण्यापूर्वी आढळणारे चार प्रमुख जोखीम घटक ओळखण्यात आले आहेत, जे जवळजवळ प्रत्येक रुग्णामध्ये दिसून आले.
हे घटक म्हणजे
उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर)
उच्च एलडीएल कोलेस्ट्रॉल
उच्च रक्तातील साखर (हाय ब्लड शुगर)
तंबाखूचे सेवन
संशोधनानुसार, या चारपैकी किमान एक संभावित घटक ९९ टक्के हृदयाशी संबंधित घटनांपूर्वी अस्तित्वात होता.
महिलांमध्येही स्पष्ट संकेत
ही बाब विशेषतः धक्कादायक आहे की, ६० वर्षांखालील महिलांमध्ये, ज्यांना सामान्यतः कमी धोका असलेले मानले जाते, तिथेही ९५ टक्क्यांहून अधिक हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोक हे याच घटकांशी संबंधित होते.
सर्वात मोठा धोका – उच्च रक्तदाब
या चारही घटकांमध्ये उच्च रक्तदाब सर्वाधिक आढळला. अमेरिका आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांमध्ये ज्यांना हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा हार्ट फेल्युअर झाला, त्यांच्यापैकी ९३ टक्क्यांहून अधिक लोकांना आधीपासूनच उच्च रक्तदाब होता. याचा अर्थ असा की, जर रक्तदाब योग्य वेळी नियंत्रणात ठेवला, तर हृदयविकारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.
डॉक्टरांचे मत
या अभ्यासाचे वरिष्ठ लेखक आणि नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. फिलिप ग्रीनलँड यांच्या मते, हे संशोधन स्पष्टपणे दर्शवते की हृदयविकार होण्यापूर्वी जवळजवळ नेहमीच एखादा नियंत्रणात आणता येण्यासारखा धोका असतो. त्यांचे म्हणणे आहे की आता लक्ष अशा कारणांवर केंद्रित करणे गरजेचे आहे, जे बदलता येऊ शकतात आणि नियंत्रणात ठेवता येतात.
