चालता चालता अचानक पायाला ठेच लागते आणि बाकी बोटं तर वाचतात मात्र पिटुकलीशी करंगळी मात्र कायम बळी पडते. (Stumbling on the little finger, brittle nails , it hurts alot, if your little finger is hurt don't ignore , home remedies )ठेच लागल्यावर कळ डोक्यात जाते. फार त्रास होतो. थोड्या वेळासाठी दुखणे सहन करावे लागतेच. पण जर काही वेळात वेदना थांबल्या नाहीत तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. करंगळी फार नाजूक अवयव असतो. त्यामुळे काळजी घ्यायला हवी.
करंगळी आपटल्यावर वेदना, सूज आणि कधी कधी थोडेफार रक्तस्राव होतो. करंगळी ही इतर बोटांपेक्षा लहान असते त्यामुळे करंगळीची हाडे आणि नसा अत्यंत नाजूक असतात. ती इतर बोटांपेक्षा पटकन दुखावू शकते आणि नेमकी ठेचही तिलाच लागते. बोट आपटल्यानंतर आपण दुसऱ्या पायाच्या टाचेने करंगळीवर जोर देतो आणि मग विषय सोडतो. मात्र तसे न करता काही साधे उपाय करा. ज्यामुळे वेदना थांबतील आणि पुढील त्रास थांबवता येतील.
करंगळीला बर्फ लावायचा. हा प्राथमिक आणि अत्यंत उपयोगी उपाय आहे. बर्फातील थंडावा करंगळीची सूज कमी करतो जर सुज आली नसेल तर येऊही देत नाही. वेदनाही थोड्याफार प्रमाणात आटोक्यात येतात. काही जास्त त्रास झाला नसेल तर फक्त बर्फ लावणे पुरेसे असते. मात्र बर्फ लावताना तो थेट त्वचेवर न लावता एका स्वच्छ फडक्यात गुंडाळायचा. नंतर बोटावर लावायचा. बोट आपटल्यावर ते सतत हलवू नये, त्याला आराम द्यावा. सततच्या हालचालीने दुखापत अधिक वाढण्याची शक्यता असते. शक्य असल्यास बोट एका जागी स्थिर ठेवायचे. काही वेळेस दुखापत इतकी तीव्र असते की बोट हलत नाही, किंवा करंगळी वाकडी झाल्यासारखी वाटते. अशावेळी डॉक्टरांकडे जाऊन एक्स-रे काढून घ्यावा. खूप दुखत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार करावे.
फक्त करंगळीच दुखत नाही अनेकदा ठेच लागल्यावर बोटावरील नख उडते किंवा नखाचा तुकडा पडतो. अशावेळी घाबरून न जाता त्या जागेवरचा रक्तस्राव थांबवणे महत्त्वाचे असते. स्वच्छ कपड्याने जखम दाबून ठेवावी. नंतर जागा जरा साफ करावी. नख उडाल्यावर जखम कोरडी ठेवणे आणि स्वच्छ पट्टी बांधणे गरजेचे असते. रोज पट्टी बदलावी आणि जखम पुन्हा स्वच्छ करून औषध लावावे. काही वेळेस नख पूर्ण उडते आणि त्याखालील त्वचा उघडी पडते. अशावेळी ती जागा खूप संवेदनशील होते त्याला काहीच लागणे चांगले नाही. धूळ मातीमुळे सेफ्टिक होऊ शकते. त्यामुळे ती जागा नेहमी स्वच्छच ठेवावी. नवे नख पुन्हा येण्यासाठी काही महिने लागतात, त्यामुळे संयम ठेवावा. डॉक्टरांकडे जावे आणि उपचार घ्यावेत. कारण नख उडाल्यावर पस होण्याची शक्यता जास्त असते. जर बोट खूप सूजले असेल, ताप आलेला भासत असेल, नखाखाली पस दिसत असेल किंवा खूप दिवसांनीही आराम मिळत नसेल तर हे लक्षण गंभीर असू शकते. अशा वेळी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.