Join us   

उन्हाळ्यात किडनी स्टोनचा त्रास वाढू शकतो, लक्षात ठेवा ५ घरगुती उपाय- धोका टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 5:55 PM

How To Control Kidney Stone Problem: उन्हाळ्यात अनेकांना किडनी स्टोनचा त्रास जाणवायला लागतो किंवा ज्यांना हा त्रास आहे, त्यांचा वाढतो. म्हणूनच आजाराची योग्य काळजी घेतलेली बरी..

ठळक मुद्दे उन्हाळ्यात या आजाराची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. युरीक ॲसिडचं प्रमाण वाढत गेलं की मग किडनी स्टोनचा त्रास आपोआपच डोके वर काढू लागतो.

किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्याचा त्रास उन्हाळ्यात बरेचदा डोके वर काढतो. जेव्हा युरिनमध्ये कॅल्शियम, युरीक ॲसिड आणि ऑक्झालेट या घटकांचं प्रमाण वाढतं आणि ते एकत्र येऊ लागतात, तेव्हा युरिन ट्रॅकमध्ये (urine track) आणि किडनीमध्येही (kidney) त्याच्या गाठी तयार होतात. त्यालाच आपण किडनी स्टोन किंवा मग मुतखडा म्हणून ओळखतो. वय, खाण्यापिण्याच्या सवयी, अनुवंशिकता, लाईफस्टाईल अशा अनेक गोष्टी किडनीस्टोन (kidney stone) होण्यासाठी आणि तो आजार वाढण्यासाठी कारणीभूत असतात. पण उन्हाळ्यात या आजाराची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. 

 

याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे उन्हाळ्यात डिहायड्रेशनचं (dehydration in summer) वाढलेलं प्रमाण. उन्हाळ्यात खूप जास्त घाम येतो. त्यामुळे आपोआपच शरीरातली पाणी पातळी कमी कमी हाेत जाते आणि मग युरिनरी ट्रॅकमध्ये युरीक ॲसिडची पातळी वाढत जाते. युरीक ॲसिडचं प्रमाण वाढत गेलं की मग किडनी स्टोनचा त्रास आपोआपच डोके वर काढू लागतो. त्यामुळेच ज्यांना किडनीस्टोनचा त्रास आहे, अशा लोकांनी उन्हाळ्याच्या दिवसांत विशेष काळजी घ्यावी आणि आहाराची काही पथ्ये आवर्जून पाळावीत.

 

उन्हाळ्यात किडनी स्टोनचा त्रास वाढू नये, यासाठी..... १. शरीरातील पाणी पातळी संतुलित राखण्यासाठी उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. यामुळे किडनी स्टोनचा त्रास वाढण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. यासाठी दररोज दोन ते साडेतीन लीटर पाणी प्यावे, असे सांगितले जाते. २. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रक्रिया केलेले पॅकींगचे अन्नपदार्थ तसेच जास्त मीठ असणारे खारवलेले पदार्थ खाणे टाळावे. तसेच विकत मिळणारे कोल्ड्रिंक्सही उन्हाळ्यात घेणे टाळावे. हे ड्रिंक्स खूप जास्त ॲसिडीक असतात. शरीरातील ॲसिडिक घटक वाढले की मुतखड्याचा त्रास वाढू शकतो. 

३. उन्हाळ्याचे २ महिने कॅल्शियमचा वापरही मर्यादित असावा. पण यामुळे शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होणार नाही, याची काळजी घ्या. नाहीतर कॅल्शियमची कमतरता इतर काही आजारांचा धोका वाढवते. ४. उन्हाळ्यात हाय प्रोटीन डाएट घेणे तसेच खूप जास्त गोड पदार्थ खाणे, यामुळेही किडनी स्टोनचा त्रास वाढू शकतो. ५. इतर काही आजारांमुळे ॲण्टीबायोटिक्सचा हेवी डोस सुरू असेल तरीही त्या गोळ्यांमध्ये असणाऱ्या घटकांमुळे किडनी स्टोनचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे या बाबतीत डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसार औषधींमध्ये आवश्यक तो बदल करून घ्यावा.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्ससमर स्पेशलपाणीहोम रेमेडी