अति तेथे माती, ही केवळ म्हण नाही तर निरोगी आयुष्याचा मंत्र आहे. कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणे वाईटच! मग ते अति खाणे असो नाहीतर अति व्यायाम!हाच नियम मैद्याच्या बाबतीतही लागू पडतो. वाचून धक्का बसेल, पण मैद्याला पर्याय गव्हाच्या पिठाचा, साखरेला पर्याय गुळाचा, चहाला पर्याय ग्रीन टी चा हे वास्तविक पाहता एकमेकांची भावंडं आहेत. त्यामुळे कोण कोणापेक्षा चांगला आणि कोण वाईट हा भेद करता येणे शक्य नाही. अगदी लिंबाचा रस अति प्रमाणात शरीरात गेला तर तोही घातकच ठरतो, मग एकट्या मैद्याला दोष देणे योग्य नाही. तरीदेखील हा अपप्रचार नेमका कशामुळे झाला ते जाणून घेऊ.
मैद्याने पोट फुगते का?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या समजुतीत अजिबात तथ्य नाही! जर आपण ते शिजवून वापरात आणले तर ते आतड्याला चिकटण्याचा किंवा त्याच्यामुळे पोटफुगी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मैदा गव्हापासून बनवला जातो. फक्त त्यावर प्रक्रिया केल्यामुळे त्यात पोषक तत्त्व उरत नाहीत. विशेषतः त्यातून फायबर निघून जाते ज्यामुळे पचन मंदावते आणि पोट जड झाल्यासारखे वाटते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते. पोट स्वच्छ झाले नाही तर पोटाचे विकार होतात, वजन वाढू लागते. अन्नाचे चरबीत रूपांतर होऊ लागते आणि चरबी वाढल्यामुळे हृदयावर ताण येतो आणि हृदयविकार उद्भवतो.
मैद्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यात फारच कमी प्रथिने असतात, ज्यामुळे हाडे आणि स्नायू कमकुवत होतात. म्हणून मैद्याच्या पदार्थांचे अति सेवन वाईट मानले जाते. मात्र आरोग्य बिघडण्यास ते एकमेव कारण ठरू शकत नाही. जर कधी मैद्याचे पदार्थ खाल्ले तर ते पचवण्यासाठीही मेहेनत घेतली पाहिजे. सेलेब्रिटी ज्याप्रमाणे चिट डे च्या दिवशी थोडेफार अनारोग्यकारी गोष्टी खातात, पण त्या बदल्यात जिम मध्ये २ तास एक्स्ट्रा वर्क आउट करतात, त्यांच्याप्रमाणे आपणही समोसा, पुऱ्या, केक असे पदार्थ खाल्ले तर एक वेळचे जेवण टाळून पचण्यासाठी अवधी दिला पाहिजे. हा तोल साधता आला तर काहीच वाईट नाही. त्यामुळे बागुलबुवा करणे सोडा, खा, प्या, पचवा आणि मस्त राहा!