शरीराचा सारा भार पायांवरच असतो, त्यामुळे पाय दुखणे सहाजिक आहे. टाचेदुखी ही फारच सामान्य तक्रार आहे आणि ती अनेक कारणांनी उद्भवते. दिवसभर उभे राहणे, चालणे किंवा जास्त वजनामुळे टाचेला सतत ताण येतो आणि त्यामुळे सूज, ताण किंवा दुखणे सुरू होते. टाचा दुखण्यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे प्लांटर फॅसिआयटीस ही समस्या. (Health tips, do you have heel pain, even walking is difficult? Check out 5 home remedies - painful heels will be cured)ज्यात टाच ते पायाच्या बोटांपर्यंत जाणाऱ्या स्नायूंच्या पट्टीवर जास्त ताण येतो. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा पाय जमिनीवर टेकवला की टाचेत तीव्र वेदना जाणवणे हे त्याचे पहिले लक्षण. काही वेळा हाडांच्या टोकाला उंचवटा तयार होतो ज्याला 'हील स्पर' म्हणतात आणि त्यामुळेही वेदना वाढते. चुकीचे किंवा घट्ट पादत्राणे वापरणे, पायाची ठेवण, लांब अंतर चालणे यामुळेही टाचेच्या स्नायूंवर ताण येतो. जास्त वजन असलेल्या व्यक्तींना टाचेदुखी लवकर जाणवते कारण पायावर अधिक भार पडतो.
टाचेदुखीवर उपाय करताना सर्वप्रथम पायाला पुरेसा आराम देणे आवश्यक आहे. जास्त वेळ उभे राहणे किंवा कठीण पृष्ठभागावर जास्त वेळा चालणे टाळावे. योग्य आकाराची आणि मऊ तळव्याची चपल किंवा बूट वापरणे उपयुक्त ठरते. दुखऱ्या भागावर दिवसातून काही वेळा थंड पाण्याची पिशवी ठेवली की सूज कमी होते. तसेच गरम पाण्यात पाय बुडवून बसणे फायद्याचे ठरते. सकाळी उठल्यावर पायाचे स्नायू मोकळे करणारे हलके व्यायाम, स्ट्रेचिंग आणि पायाची साधी मालीश यामुळे वेदना कमी होतात. वजन नियंत्रित ठेवणे आणि चालताना योग्य पोश्चर ठेवणेही आवश्यक आहे. काही जण अति व्यायाम करतात, त्याचाही परिणाम पायांवर होतो. टाचेवर जास्त भार पडेल असे व्यायाम प्रकार करताना काळजी घेणे गरजेचे.
काही वेळा औषधोपचार किंवा डॉक्टरांनी सुचवलेले विशेष पादत्राणे उपयोगी पडतात. वेदना दीर्घकाळ टिकली किंवा वाढत गेली तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. कारण कधीकधी ही समस्या इतर सांधेदुखीच्या आजारांशी संबंधित असू शकते. तसेच सतत टाच दुखत असेल तर त्याचा परिणाम चालण्यावर होतो. त्यामुळे चालण्याची पद्धत बदलते. लंगडायची सवय लागते. त्यामुळे वेळीच उपाय करणे गरजेचे असते.