उपासाचे दिवस आले की आपल्या आहारात लगेच एका पदार्थाची वाढ होते. लोकप्रिय असा उपासाचा घटक म्हणजे साबुदाणा. उपवासातील हलका, पचायला सोपा आणि ऊर्जा देणारा पदार्थ म्हणून साबुदाण्याचे विविध प्रकार उपासाला केले जातात. (health tips, Before eating hot sago khichdi, read this: Is sago good for health or very dangerous?)साबुदाण्याचे खिचडी, वडा, थालीपीठ, पापड आणि खीर यांसारख्या चविष्ट पदार्थ करता येतात. मात्र, साबुदाणा पोषणदृष्ट्या फार चांगला नाही. त्यातून शरीराला फार गरजेचे असे काही मिळत नाही. त्यामुळे साबुदाणा खवा की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो.
साबुदाण्यात भरपूर स्टार्च असते. यामध्ये प्रथिने, तंतूमय घटक, जीवनसत्वे आणि खनिजे फारशी नसतात. त्यामुळे शरीराला फक्त ऊर्जा मिळते पण पोषण फारसे मिळत नाही. उपासाच्या दिवशी भूक लागल्यावर पटकन पोट भरण्यासाठी लोक साबुदाण्याचे विविध पदार्थ खातात. साबुदाणा चवीला मस्त लागतो.
कोणतीही गोष्ट अति खाल्याने त्रास होतोच. साबुदाण्याचेही तसेच. जास्त प्रमाणात साबुदाणा खाल्ल्यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो. कारण साबुदाणा हा पूर्णपणे कार्बोहायड्रेट्सने भरलेला असतो. तो पचण्यासाठी वेळ लागतो आणि अनेक वेळा गॅस, अपचन किंवा मळमळ होण्याची शक्यता असते. उपासाच्या दिवशी जळजळते त्याचे कारण अनेकदा साबुदाणाच असतो. विशेषतः ज्यांना आधीच पचनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे अधिक त्रासदायक ठरू शकते.
साबुदाणा खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढते. कारण साबुदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी उपासाच्या निमित्ताने जास्त प्रमाणात साबुदाणा खाल्ल्यास त्यांच्या शरीरातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. यासाठी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते.
साबुदाणा जास्त खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता देखील असते. स्टार्च आणि तेलात परतलेले साबुदाण्याचे पदार्थ सतत खाल्ल्यास शरीरात चरबी वाढत जाते. त्यामुळे उपासाच्या नावाखाली रोज साबुदाणा खाल्ला गेला, तर तो आरोग्यास हितकारक ठरण्याऐवजी हानिकारक ठरतो.
साबुदाणा उपासाला वर्षानुवर्षे आवडीने खाल्ला जात आहे. त्यात ना फायबर आहे, ना पोषक घटक. म्हणून जर इतर काही पदार्थ सोबत घेतले तर संतुलन राखता येते. त्यामुळे साबुदाण्याचे पदार्थ करताना त्यात दाण्याचे कुट , दही, हिरवी मिरची, तूप असे पदार्थ घातले जातात. त्यामुळे संतुलन राखता येते.