Join us   

आंबट गोड बोरं खाल्ली की नाही? महागड्या फॅन्सी फळांपेक्षा तब्येतीसाठी जास्त गुणाचा रानमेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2023 9:43 AM

health benefits of eating ber bora or jujube fruit in Marathi : वर्षभरातून अवघे दिड ते दोन महिनेच मिळणारं हे फळ आरोग्य उत्तम राहण्यासाठी आवर्जून खायला हवं.

आरोग्य उत्तम राहण्यासाठी स्थानिक फळं खायला हवीत असं आपण वारंवार ऐकतो. मात्र तरीही सफरचंद, किवी, ड्रॅगन फ्रूट अशी फॅन्सी आणि महागडी फळं खाण्याचं फॅड सध्या वाढत आहे. ही फळं खाणं चांगलं असलं तरी आपल्या मातीत पिकणारी फळं त्या त्या सिझनमध्ये आवर्जून खायला हवीत. थंडीच्या दिवसांत चिकू, सिताफळं, पेरु अशी इतर फळं मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे ही फळं आवर्जून खाल्ली जातात. पण बोरांसारख्या लहान फळाकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं (health benefits of eating ber bora or jujube fruit in Marathi ). 

रानमेवा म्हणून ओळखली जाणारी बोरं शाळेत असताना आपल्यापैकी प्रत्येकाने शाळेबाहरेच्या गाडीवर कधी ना कधी खाल्लेली असतात. पण मोठं झाल्यावर मात्र आपण या फळांना पू्र्ण विसरुन जातो. लहान आकाराची लाल बोरं, चिकट बोरं, मोठ्या आकाराची बोरं असे बोरांचे बरेच प्रकार गावाकडे मिळतात. शहरातील बाजारातही काहीवेळा हे प्रकार मिळतात. वर्षभरातून अवघे दिड ते दोन महिनेच मिळणारं हे फळ आरोग्य उत्तम राहण्यासाठी आवर्जून खायला हवं. बोर हे फळं दिसायला लहान असलं तरी ते आरोग्यासाठी कमालीच्या फायद्याचे असते. तेव्हा हे फळ आवर्जून खा आणि  बोरं खाण्याचे ५ फायदे समजून घ्या...

(Image : Google)

१. सी व्हिटॅमिन हे केवळ आंबट फळांमध्ये असते असा आपला समज असतो. मात्र बोरांमध्ये सी व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी बोरांचा आहारात आवर्जून समावेश करावा. 

२. वजन कमी करणाऱ्यांसाठी बोरं हे अतिशय उत्तम फळ आहे. कारण यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असूनही ऊर्जा जास्त प्रमाणात असते. 

३. बोरांमध्ये अँटीॉक्सिडंटसचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे त्वचा आणि केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. इतकेच नाही तर कॅन्सरसारखा असाध्य आजार होऊ नये म्हणूनही ही अँटीऑक्सिडंटस उपयुक्त ठरतात.

(Image : Google)

४. थंडीच्या दिवसांत पचनशक्ती सुधारावी म्हणून बोरं खाणं फायदेशीर ठरतं. इतकंच नाही तर बद्धकोष्ठता, गॅसेस यांसारख्या संमस्यांवरही बोरं चांगली असतात.

५. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास बोरं खाण्याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळेच मधुमेहींना आवर्जून बोरं खाण्याचा सल्ला दिला जातो.   

टॅग्स : आरोग्यफळेआहार योजना