हिवाळ्याच्या गुलाबी थंडीसोबतच आपल्या शरीरात अनेक बदल जाणवू लागतात, यातील सर्वात पहिला परिणाम आपल्या नाजूक ओठांवर होतो. ओठ कोरडे पडले की आपण नकळतपणे त्यावर जीभ फिरवतो. आपल्याला वाटते की यामुळे ओठांना थंडावा मिळेल आणि ते ओले राहतील, पण खरी समस्या इथूनच सुरू होते. ओठांवरुन वारंवार जीभ फिरवण्याची ही छोटीशी सवय ओठांचे नैसर्गिक सौंदर्य हिरावून घेऊ शकते(winter lip licking habit side effects).
वैज्ञानिक भाषेत याला 'लिप लिकिंग सिंड्रोम' (Lip Licking Syndrome) असे म्हटले जाते. अनेकांना ही एक साधी सवय वाटते, परंतु यामुळे ओठांना जखमा होणे, ओठ अधिक काळे पडणे किंवा गंभीर इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. केवळ ओलावा मिळवण्यासाठी केलेली ही कृती तुमच्या ओठांसाठी किती घातक ठरू शकते याची माहिती बरेचदा आपल्याला नसते. कोरडे ओठ ओले करण्यासाठी वारंवार ओठांवरून जीभ फिरवण्याची ही सवय (lip licking syndrome in winter) वेळीच का मोडली पाहिजे आणि त्यावर योग्य उपाय काय आहे, याबद्दल अधिक (harmful effects of lip licking syndrome) माहिती कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, डर्माहील स्किन अँड क्लिनिकचे डॉ. नवजोत अरोरा अधिक माहिती देत आहेत.
ओठ कोरडे पडतात म्हणून वारंवार ओठांना थुंकी लावण्याची सवय नक्की काय आहे?
डॉ. नवजोत अरोरा सांगतात की, “जेव्हा आपण ओठांवरून जीभ फिरवतो किंवा ओठ चाटतो, तेव्हा लाळेमुळे काही सेकंदांसाठी ओठ ओले झाल्याचा भास होतो. मात्र, जशी ही ओठांवरील लाळ सुकू लागते, तशी ती ओठांमधील नैसर्गिक ओलावा देखील स्वतःसोबत खेचून नेते. यामुळे ओठ पूर्वीपेक्षा अधिक कोरडे होतात. खरे तर, आपल्या लाळेमध्ये असे काही एन्झाइम्स असतात जे अन्नपदार्थ पचवण्यास मदत करतात. हेच एन्झाइम्स ओठांच्या अत्यंत नाजूक त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात, ज्यामुळे त्वचेचा नैसर्गिक संरक्षणात्मक थर कमकुवत होतो. ओठांची त्वचा शरीराच्या इतर भागांच्या त्वचेच्या तुलनेत खूप जास्त पातळ असते आणि त्यामध्ये 'ऑइल ग्लॅंड्स' (तेल ग्रंथी) नसतात. याच कारणामुळे ओठ लवकर कोरडे पडतात आणि वारंवार ओठांना थुंकी लावल्याने ओठांची जळजळ, लालसरपणा येणे किंवा भेगा पडणे अशा समस्या सुरू होतात.
केसांसाठी आई-आजीचा सुपरहिट फॉर्म्युला! चमचाभर पावडर करेल जादू - महिन्याभरात वेणी दिसेल दुप्पट जाड...
'लिप लिकिंग सिंड्रोम' म्हणजे नक्की काय?
डॉ. नवजोत अरोरा यांच्या मते, “लिप लिकिंग सिंड्रोममध्ये (Lip Licking Syndrome) वारंवार कोरड्या ओठांना थुंकी लावण्याच्या सवयीमुळे आपण नकळतपणे स्वतःच्या ओठांचे आणि त्याभोवतीच्या त्वचेचे नुकसान करून घेतो. यामध्ये केवळ ओठच नाही, तर ओठांच्या आजूबाजूची त्वचा देखील लाल होते, कोरडी पडते आणि त्वेचेचे पापुद्रे निघू लागतात.
खरेतर, या सिंड्रोममध्ये एक प्रकारचे चक्र तयार होते. सगळ्यात आधी आपले ओठ कोरडे पडतात, मग ते ओले करण्यासाठी आपण ओठांवर थुंकी लावतो, ज्यामुळे थोडा वेळ आराम मिळतो. मात्र, लाळ सुकताच ओठ आधीपेक्षा जास्त कोरडे पडतात आणि त्वचा फाटू लागते आणि ते पुन्हा ओले करण्यासाठी आपण पुन्हा ओठांवर थुंकी लावतो, हा दिनक्रम दिवसभर सुरूच राहतो. जर वेळेत ही सवय थांबवली नाही, तर ओठांमध्ये संसर्ग, सूज येणे आणि दीर्घकाळ टिकणारा कोरडेपणा यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
हिवाळ्यात 'लिप लिकिंग'ची समस्या का वाढते?
डॉ. नवजोत अरोरा सांगतात की, हिवाळ्यात हवेतील आर्द्रता (ओलावा) कमी असते, ज्यामुळे त्वचा वेगाने कोरडी पडते. थंड हवेमुळे ओठांमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो, तसेच सूर्याच्या अतिनील (UV) किरणांमुळेही ओठांचे नुकसान होऊ शकते. याव्यतिरिक्त, थंडीत आपण पाणी कमी पितो, ज्यामुळे शरीर आतूनही डिहायड्रेट राहते. या सर्व कारणांमुळे ओठ अधिक संवेदनशील होतात आणि वारंवार 'लिप लिकिंग' करण्याची सवय लागते, हे नुकसान कित्येक पटीने वाढवते.
हिवाळ्यात ओठांची काळजी कशी घ्यावी?
१. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वारंवार ओठांवरून जीभ फिरवण्याची किंवा ओठांवर थुंकी लावण्याची सवय जाणीवपूर्वक बंद करा.
२. असा लिप बाम वापरा ज्यामध्ये शिया बटर, मेण, खोबरेल तेल, बदामाचे तेल किंवा पेट्रोलियम जेली असेल.
३. ओठ कोरडे पडण्यापूर्वीच दिवसातून अनेक वेळा लिप बाम लावत राहा, जेणेकरून ओठांमधील ओलावा टिकून राहील. झोपण्यापूर्वी ओठांवर लिप बाम किंवा पेट्रोलियम जेलीचा जाड थर लावा. रात्रीच्या वेळी ओठांची त्वचा स्वतःला 'रिपेअर' करत असते, त्यामुळे हा उपाय अतिशय फायदेशीर ठरतो.
४. शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि ओठांचे आरोग्य यांचा थेट संबंध असतो. त्यामुळे हिवाळ्यातही दिवसातून किमान ७ ते ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे.
५. 'मॅट' आणि 'लाँग लास्टिंग' लिपस्टिक ओठांना अधिक कोरडे करू शकतात. हिवाळ्यात त्याऐवजी 'क्रीमी' किंवा लिप बाम बेस्ड लीप प्रॉडक्ट्स वापरणे फायदेशीर ठरते.
६. फाटलेल्या ओठांवर स्क्रब केल्याने बारीक जखमा होऊ शकतात. यामुळे वेदना आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो.
