डॉ. दाक्षायणी पंडित
कालपासून सोनालीला ताप होता, लघवीला जळजळत होते आणि वारंवार जावं लागत होतं. आज सकाळी पहिल्या लघवीला आधी घट्टसा पांढरट पू बाहेर आला आणि नंतर आग होत लघवी झाली. तिला डॉक्टरांकडे जावंच लागलं. डॉक्टरांच्या सल्यानुसार तिने लघवी तपासणीसाठी दिली. त्याचा अहवाल पाहून डॉक्टरांनी विचारले, “आपले पतिदेव काय काम करतात?”
“डॉक्टर, तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव आहे. १५-१५ दिवस फिरतीवर असतो.” इति सोनाली.
“ते इथे असतील तर त्यांना पाठवून द्या इकडे.”- डॉक्टर.
सोनालीला परमा झाला होतं. त्यावर डॉक्टरांनी सोनालीला औषधे लिहून दिली.
आजाराचं नाव – परमा / गोनोऱ्हिया (Gonorrhoea)
रोगकारक जंतू – गोनोकोकाय नावाचे जिवाणू.
अनेकांशी लैंगिक संबंध, देहविक्रय करणाऱ्या व्यक्तींशी संबंध आल्याने हा आजार होतो. लैंगिक स्वैराचारी व्यक्तींना परम्याचा संसर्ग खूप जास्त प्रमाणात होतो. किशोर-किशोरी व तरुण तरुणी देखील या रोगाला लवकर बळी पडतात. तसेच बराच काळ नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने कुटुंबापासून दूर राहणाऱ्या काही व्यक्ती देहविक्रय करणाऱ्यांच्या संपर्कात येतात व बाधित होऊन परततात. घरी येऊन ते हा प्रसाद आपल्या लैंगिक भागीदारास देतात. हेच घडले होते वर दिलेल्या सोनालीच्या बाबतीत. जंतू एकदा शरीरात शिरले की स्त्रियांना मूत्रमार्गाचा किंवा जननेंद्रियांचा संसर्ग होतो. त्याच्यावर वेळेवर व डॉक्टरांनी सांगितले तेवढे दिवस उपचार केल्यास रुग्ण बरा होतो. पण लक्षणे असताना उपचारच न घेणे किंवा अर्धवट घेणे यामुळे अनेक गुंतागुंती उद्भवू शकतात. लक्षणे – संसर्ग झाल्याच्या १ ते १५ दिवसात लक्षणे दिसू लागतात. लक्षणे सौम्य असतात. लघवी करताना दुखणे, लघवीतून पांढरा, पिवळा किंवा हिरवट रंगाचा पू जाणे, योनीमार्गातून होणारा स्त्राव नेहमीपेक्षा जास्त होणे, दोन पाळ्यांच्या मधल्या काळात पुन्हा रक्त जाणे इ. लक्षणे असतात. ती त्रासदायक होत नाहीत तोवर दुर्लक्ष केले जाते. या काळात जंतू शरीरात पसरून गुंतागुंतीची स्थिती निर्माण होऊ शकते. मुखमैथुन वा गुदमैथुन असल्यास लक्षणे सहसा नसतात. मुखमैथुन असल्यास कधी कधी घसा दुखून आजार सुरु होतो. मूत्रमार्गाचा संसर्ग दुर्लक्षित राहिल्यास मूत्रनलिकेस जखमा होतात. त्या बऱ्या होताना मूत्रनलिका आक्रसते. यामुळे लघवीस अडथळा निर्माण होतो. सौम्य संसर्गात जंतू स्त्रीच्या योनीमार्गात शांतपणे राहतात व ती वाहक बनते. नंतर प्रसूतीच्या वेळी जंतू घेऊन बाळ जन्माला येते व त्याचे लगेचच डोळे येतात.
उपचार – प्रतिजैविके व वैयक्तिक स्वच्छता हे महत्वाचे उपचार. वाहक आईमुळे बाळ जन्मतःच बाधित असल्यास त्याच्या डोळ्यात प्रतिजैविक मलम घालून, व लक्षणरहित आई वरही प्रतिजैविक देऊन उपचार करतात. रुग्णासोबत लैंगिक सहकाऱ्यावरही उपचार करणे आवश्यक. हे शक्य नसल्यास दोघांनीही जोखमीचे वर्तन करू नये.
प्रतिबंध- काँडोमचा वापर, जोखमीच्या वर्तनापासून दूर राहणे, शंका आल्यास किंवा लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार घेणे, यामुळे संसर्ग रोखता वा नियंत्रणात ठेवता येतो. त्वरित उपचार घेण्याने पुढची गुंतागुंत व भविष्यात तुमच्याकडे येणाऱ्या बाळाचा संसर्ग तुम्ही टाळू शकता. गोनोकोकाय वर लस उपलब्ध नाही. त्यामुळे काळजी घेणे आणि जोखमीचे वर्तन टाळणे हाच उपाय आहे.
(लोखिका एम बी बी एस, एम डी. असून डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व चिकित्सा प्रयोगशाळेच्या प्रमुख निवृत्त प्राध्यापिका आहेत. )