गॅसेसचा त्रास हा अनेकांना अधूनमधून होणारा सामान्य त्रास आहे. पोटात वात वाढला की पोट फुगणे, ढेकर येणे किंवा हलकी जळजळ अशी लक्षणे दिसतात. पण हा वात जर वरच्या दिशेने सरकत छातीपर्यंत पोहोचला, तर हा त्रास अधिक गंभीर आणि त्रासदायक ठरु लागतो. (Gas causes stomach cramps, chest pain and risk of heart attack, see 5 remedies to prevent gas problems from increasing)छातीत जडपणा येणे, जळजळ होणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा अचानक भीती वाटणे ही सर्व लक्षणे गॅसेस छातीपर्यंत गेल्यामुळे दिसू शकतात. कधी कधी हा त्रास हृदयविकारासारखा भासतो, म्हणून लोकांना जास्त भीती वाटते.
मुळात जठरात तयार होणारा अतिरिक्त वायू वरच्या दिशेने सरकला की आम्ल (अॅसिड) त्याच्यासोबत वर येते. त्यामुळे इसोफॅगसमध्ये जळजळ निर्माण होते आणि छातीमध्ये जळजळ किंवा जडपणा जाणवतो. वारंवार असे होत राहिले तर जेवणानंतर अस्वस्थता वाढते, झोपताना त्रास होतो आणि रोजच्या कामात लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते.
हा त्रास पूर्णपणे टाळता येऊ शकतो, फक्त काही साध्या सवयी पाळण्याची गरज असते. रात्री उशिरा जेवणे टाळावे, कारण पचन मंद झाल्यावर वात जास्त तयार होतो. अति तेलकट, मसालेदार आणि आम्लयुक्त पदार्थ कमी खाल्ले तर वर जळजळ निर्माण होण्याची शक्यता कमी होते. जेवताना खूप घाई न करता शांतपणे खाल्ले तर पोटात हवा कमी जाते आणि गॅस वाढत नाही.
जेवणानंतर लगेच झोपणे ही कृती टाळणेही महत्त्वाचे आहे. किमान अर्धा तास चालणे किंवा थोडेफार हलणे गरजेचे असते. जेवणाचे शेड्यूल सुधारले तर पचन सुधारते आणि गॅसेस वर येत नाहीत. पाणी दिवसभर थोड्या-थोड्या प्रमाणात प्यावे. कोमट पाणी प्ययाल्यास गॅस सहज बाहेर पडतो आणि आराम मिळतो.
आलं, बडीशेप, हिंग किंवा जिरे यांचा घरगुती उपयोग सुद्धा या तक्रारीत मोठा फरक पाडू शकतो. या पदार्थांमुळे पचन सुधारते, वात कमी होतो आणि छातीत जळजळ निर्माण करणारा दाबही कमी होतो. नियमितपणे हलका व्यायाम जसे की चालणे, योगासनातील काही प्रकार जसे की वज्रासन किंवा पचन सुधारणारी काही सोपी आसने ही देखील गॅसच्या त्रासावर उपयुक्त ठरतात.
थोडक्यात, गॅसेसचा त्रास साधा वाटला तरी तो छातीपर्यंत पोहोचला की शरीराला अस्वस्थ करून टाकू शकतो. मात्र योग्य आहार-सवयी, व्यवस्थित पचन आणि योग्य घरगुती उपाय यामुळे हा त्रास सहज टाळता येतो. वेळेवर काळजी घेतली तर छातीतील दडपण किंवा जळजळ कमी तर होतेच, पण संपूर्ण शरीर अधिक हलके, आरामदायी आणि निरोगी वाटू लागते.
