Join us

रात्री जाग येते, घशाला कोरड पडल्यानं प्यावं लागतं पाणी? सावध व्हा, 'या' आजारांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 19:47 IST

Feeling Thirsty Causes : मेडिकल टर्ममध्ये या स्थितीला नॉक्टूरिया (रात्री पुन्हा पुन्हा लघवी येणं) किंवा पॉलिडिप्सिया (रात्री जास्त तहान लागणे) असं म्हटलं जातं.

Feeling Thirsty Causes : अनेकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि त्यासाठी त्यांना झोपेतून उठावं लागतं. अनेकदा पाणी पिण्याच्या या सवयीला सामान्य समजलं जातं. पण जर असं तुमच्यासोबत नेहमीच होत असेल तर ही सवय गंभीर आजाराचे संकेत असू शकते. रात्री पुन्हा पुन्हा तहान लागण्याचा काही आजारांशी संबंध असू शकतो.

रात्री पुन्हा पुन्हा तहान लागण्याचं कारण

बऱ्याचदा लोकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते. ज्यामुळे त्यांना झोपेतून उठून पाणी प्यावं लागतं. मेडिकल टर्ममध्ये या स्थितीला नॉक्टूरिया (रात्री पुन्हा पुन्हा लघवी येणं) किंवा पॉलिडिप्सिया (रात्री जास्त तहान लागणे) असं म्हटलं जातं. ही स्थिती अजिबात नॉर्मल नाहीये. जयपूरचे डॉ. प्रवीण गुप्ता यांनी 'एबीपी'ला सांगितलं की, रात्री पुन्हा पुन्हा तहान लागणं हा डिहायड्रेशन, डायबिटीस किंवा किडनीसंबंधी समस्येचा इशारा असू शकतो. जर ही समस्या जास्त दिवसांपर्यंत होत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

या आजारांचा होऊ शकतो धोका

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, रात्री पुन्हा पुन्हा तहान लागणं आणि पाणी पिणं याचा अनेक आजारांशी संबंध असू शकतो.

डायबिटीस मेलिटस (Diabetes Mellitus)

रात्री जास्त वेळा तहान लागण्याचं कारण टाइप २ डायबिटीस असू शकतं. जेव्हा ब्लड शुगर लेव्हल वाढतो, तेव्हा आपलं शरीर एक्स्ट्रा ग्लूकोजला लघवीच्या माध्यमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळेच पुन्हा पुन्हा लघवी येते आणि डिहायड्रेशनमुळे पुन्हा पुन्हा तहान लागते.

डायबिटीज इन्सिपिडस (Diabetes Insipidus)

जेव्हा किडनी शरीरात पाण्याचं संतुलन ठेवण्यास निकामी ठरतात, तेव्हा याला डायबिटीस इन्सिपिडस नावाच्या दुर्मीळ आजाराचं लक्षण मानलं जातं. यामुळे पुन्हा पुन्हा तहान लागते आणि पुन्हा पुन्हा लघवी सुद्धा लागते. ही समस्या हार्मोनल डिसबॅलन्स खासकरून अ‍ॅंटी-डाययूरेटिक हार्मोन (ADH) च्या कमतरतेमुळे होते.

किडनीमध्ये समस्या

क्रॉनिक किडनी डिजीज झाल्यावर शरीरात पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन बिघडतं. ज्यामुळे रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते. जर तुम्हाला सुद्धा रात्री पुन्हा पुन्हा तहान लागत असेल तर वेळीच किडनीची टेस्ट करून घ्या.

स्लीप अ‍ॅपनिया

स्लीप अ‍ॅपनिया आजारात झोपेदरम्यान श्वास थांबण्याची समस्या होऊ शकते. ज्यामुळे तोंड कोरडं पडतं आणि पुन्हा पुन्हा तहान लागते. याचा संबंध घोरणं आणि रात्री पुन्हा पुन्हा जागण्याशी सुद्धा असू शकतो.

टॅग्स : हेल्थ टिप्समधुमेह