Join us

शुभ-अशुभचा काहीच संबंध नाही, 'या' गंभीर समस्यांमुळे फडफडतो डोळा, आधी तब्येत काय म्हणते पाहा..

By अमित इंगोले | Updated: May 12, 2025 15:35 IST

Eye Twitching Causes : सायन्सनुसार डोळे फडफडणं आणि शुभ-अशुभ यांचा काही संबंध नाही. कारण डोळे फडफडण्याला आरोग्यासंबंधी काही समस्या कारणीभूत असू शकतात.

Eye Twitching Causes : आपल्याकडे डोळे फडफडण्याचा संबंध शुभ-अशुभ या गोष्टींशी जोडला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार असं मानलं जातं की, महिलांचा जर डावा डोळा फडफडतो तेव्हा शुभ मानलं जातं, तर उजवा डोळा फडफडणं (Eye Twitching) अशुभ मानलं जातं. तर हेच पुरूषांमध्ये उलटं असतं. सायन्स याला मानत नाही. सायन्सनुसार डोळे फडफडणं आणि शुभ-अशुभ यांचा काही संबंध नाही. कारण डोळे फडफडण्याला आरोग्यासंबंधी काही समस्या कारणीभूत असू शकतात.

अलिकडेच एका अमेरिकन डॉक्टरांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. ज्यात त्यांनी कोणत्या कारणांनी डोळे फडफडतात याबाबत सांगितलं आहे. सोबतच त्यांनी हेही सांगितलं की, कोणत्या स्थितीत डॉक्टरांशी बोललं पाहिजे.

डोळे का फडफडतात?

भारतीय वंशाचे अमेरिकन Gastroenterologist सौरभ सेठी हे नेहमीच त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर आरोग्यासंबंधी वेगवेगळी माहिती देत असतात. अलिकडेच त्यांनी डोळ्यांच्या फडफडण्याची कारणं सांगितलं आहेत. ते म्हणाले की, बऱ्याच लोकांना असं वाटतं की, तणावामुळे डोळे फडफडतात. पण याची इतरही काही कारणं असू शकतात.

मायोकेमिया

डोळ्यांच्या फडफडण्याला मेडिकल भाषेत 'Myokymia' म्हटलं जातं. ही एक कॉमन स्थिती आहे. ज्यात डोळ्यांच्या पापण्या अचानक फडफडतात. डॉक्टर म्हणाले की, मायोकिमिया एक स्नायूंमध्ये अचानक हालचाल होणारी एक स्थिती आहे. ज्यामुळे खालच्या पापण्या प्रभावित होतात. यानं फार काही नुकसान होत नाही, पण त्रास नक्कीच होतो.

कारणं

डोळे फडफडण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. ज्यात तणाव, थकवा, कॅफीन अधिक घेणं, टीव्ही, मोबाइल, लॅपटॉपसमोर जास्त वेळ बसणं, पोषक तत्वांची कमतरता जसे की, मॅग्नेशिअमची कमतरता या गोष्टींचा समावेश असतो.

डॉक्टरांना कधी दाखवावं?

डॉक्टरांनी सांगितलं हेही सांगितलं की, तुम्ही चिंता कधी केली पाहिजे. जर डोळ्यांचं फडफडणं दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ राहत असेल किंवा फडफडताना डोळा पूर्ण बंद होत असेल किंवा डोळ्यांसोबतच चेहऱ्याचा काही भागही फडफडू लागत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवायला हवं.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य