आजच्या धावपळीच्या आणि स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवाव्या लागणाऱ्या जीवनशैलीत डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सतत मोबाइल, संगणक, टीव्ही यांचा वापर, झोपेची कमतरता, अयोग्य आहार आणि प्रदूषण यांचा डोळ्यांवर थेट परिणाम होतो. आपण लहान मुलांना सांगतो स्क्रिन जास्त पाहू नका डोळे खराब होतील. खरं तर ते नियम आपल्यालाही लागू होतातच. डोळ्यांची आग होणे, कोरडेपणा, लालसरपणा, धूसर दिसणे अशा तक्रारी वाढताना दिसतात. त्यामुळे डोळे निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार आणि चांगल्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचे पोषक तत्त्व म्हणजे व्हिटामिन ए. हे दृष्टी सुधारण्यासाठी आणि रात्री नीट दिसण्यासाठी फार गरजेचे असते. गाजर, रताळे, भोपळा, पालक यांसारख्या भाज्यांमध्ये व्हिटामिन ए मुबलक प्रमाणात आढळते. त्याचबरोबर व्हिटामिन सी आणि व्हिटामिन इ हे अँटी ऑक्सिडंट्स डोळ्यांच्या पेशींचे नुकसान होऊ देत नाहीत. संत्री, मोसंबी, लिंबू, आवळा, बदाम आणि सूर्यफूलाच्या बिया यांचा आहारात समावेश केल्यास डोळ्यांना फायदा होतो. ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स हे डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यास महत्वाची मदत करतात. अक्रोड, जवस यामध्ये हे घटक आढळतात. तसेच ल्यूटीन आणि झिएक्सँथिन हे घटक डोळ्यांना हानिकारक किरणांपासून संरक्षण देतात. हिरव्या पालेभाज्या जसे की पालक, मेथी, कोबी, ब्रोकली यामध्ये हे मुबलक प्रमाणात असतात.
आहाराइतकेच काही दैनंदिन सवयीही महत्त्वाच्या आहेत. स्क्रीनसमोर काम करताना 20-20-20 नियम पाळल्यास डोळ्यांचा ताण कमी होतो. दर 20 मिनिटांनी 20 सेकंदांसाठी 20 फूट दूर पाहणे फायदेशीर ठरते. पुरेशी म्हणजेच किमान सात ते आठ तासांची झोप घेतल्यास डोळे ताजेतवाने राहतात. डोळे वारंवार चोळणे टाळावे आणि स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने धुवावेत. बाहेर जाताना तीव्र सूर्यप्रकाशापासून बचावासाठी चांगल्या दर्जाचे सनग्लासेस वापरणे गरजेचे आहे.
डोळ्यांमध्ये सतत त्रास जाणवत असल्यास दुर्लक्ष करू नये. वेळोवेळी नेत्रतज्ज्ञांकडे जाऊन तपासणी करुन घेतल्यास संभाव्य आजार लवकर ओळखता येतात. संतुलित आहार, योग्य विश्रांती आणि काही साध्या सवयींच्या मदतीने डोळे दीर्घकाळ निरोगी आणि कार्यक्षम राहू शकतात. आपल्या दैनंदिन जीवनात या गोष्टींचा समावेश केल्यास डोळ्यांचे आरोग्य निश्चितच सुधारेल.
