Join us   

बिनधास्त खा सीताफळ! सीताफळ नको म्हणत हे 4 गैरसमज असतील तर विसरा, कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 11:40 AM

सीताफळ खूप आवडतं, पण आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारींमुळे खाऊ शकत नाही. आपल्याला असलेल्या समस्यांसाठी सीताफळ चालत नाही हे आपण स्वत:च ठरवलेलं असतं. पण याबाबतचे गैरसमज आणि सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे.

ठळक मुद्दे थंडीत येणारे गोड सीताफळ सगळ्यांनी खायला हवेडायबिटीस, लठ्ठपणा, हृदयरोग यांच्यासाठी सीताफळ चांगलेघाबरु नका, माहिती घ्या आणि तुम्हाला आवडणारे सीताफळ नक्की खा

आपण ज्या ठिकाणी राहतो त्या भागात पिकणारे धान्य, फळे, भाजीपाला आपण त्या त्या ऋतूमध्ये आवर्जून खायला हवा असे आपण नेहमी ऐकतो. आपल्या भागात पिकणाऱ्या गोष्टी आपल्या आरोग्याच्या दृषअटीने पोषक असतात असे म्हटले जाते. यातही विशिष्ट ऋतूमध्ये पिकणारी फळे आरोग्यासाठी विशेष फायदेशीर असतात. थंडी सुरू झाली की बाजारात सीताफळांच्या गाड्या दिसायला सुरुवात होते. बहुतांश लोकांना आवडणारे हे फळ खूप गोड असते, त्यामध्ये गर असतो त्यामुळे आरोग्याच्या काही तक्रारी असणाऱ्यांना ते चालणार नाही असे आपण मनानीच ठरवून टाकतो. मधुमेही आणि लठ्ठ असणाऱ्यांबाबत तर असे आडाखे अगदी सर्रास बांधले जातात. मधुमेहाला फळे चालत नाहीत, त्यातही गर असलेली फळे अजिबात चालत नाहीत असे म्हटले जाते. पण सीताफळासारख्या फळांमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक घटक असतात. त्यामुळे त्याबाबत योग्य ती माहिती घेऊन डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या मदतीने निर्णय घ्यायला हवा. 

सीताफळामध्ये अँटीऑक्सिडंटस, व्हीटॅमिन सी यांचे प्रमाण जास्त असल्याने विविध प्रकारच्या अॅलर्जीपासून दूर राहण्यास मदत होते. यातील मॅग्नेशियम, फायबर, पोटॅशियम , लोह, व्हीटॅमिन ए यांमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीही हे फळ अतिशय उपयुक्त आहे. गर्भवती महिलांमध्ये या फळाला विशेष महत्त्व असून कॅल्शियम वाढण्यास सिताफळाचा उपयोग होतो. गर्भवती महिला आणि गर्भाची वाढ चांगली व्हावी यासाठी सीताफळ अतिशय उपयुक्त फळ मानले जाते. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नुकतीच एक पोस्ट करत सीताफळाबाबत अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे. सीताफळाबाबत असलेले गैरसमज आणि सत्यता  यांबाबत त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अगदी थोडक्यात पण नेमके सांगितले आहे. पाहूया काय असतात हे सामान्य गैरसमज...

गैरसमज - डायबेटीस असेल तर सीताफळ टाळावे  सत्यता - सीताफळामध्ये ग्लायकेमिक इंडेक्स कमी असतो. डायबिटीस असणाऱ्या लोकांनी ग्लायकेमिक इंडेक्स जास्त असलेले पदार्थ शक्यतो टाळावेत. कारण अशा पदार्थांमध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. तसेच डायबिटीस असणाऱ्या रुग्णांनी स्थानिक फळे खायला हवीत. 

गैरसमज - लठ्ठ असाल तर सीताफळ नको सत्यता - सीताफळामध्ये बी कॉम्प्लेक्स हा घटक असतो. प्रामुख्याने यात असलेला व्हीटॅमिन बी ६ हा घटक शरीरातील गॅस कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे शरीर फुगल्यासारखे झाले असेल तर ते कमी होण्यास मदत होते. 

गैरसमज - हृदयरोगाच्या रुग्णानी खाऊ नये  सत्यता - सीताफळामध्ये मॅंगनिजसारखा शरीराला आवश्यक असणारा खनिज पदार्थ असतो. तसेच सीताफळातील व्हीटॅमिन सी मुळे हृदयाचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते. 

गैरसमज - PCOD असलेल्यांनी सीतापळ खाणे टाळावे सत्यता - सीताफळात लोहाचे प्रमाण चांगले असल्याने ते महिलांसाठी अतिशय चांगले असते. अनेकदा महिलांना विविध कारणांनी थकल्यासारखे वाटते, पण सीताफळ खाल्ल्यास त्यांचा हा थकवा दूर होण्यास मदत होते. तसेच काही कारणांनी तुम्ही चिडचिडे झाले असाल तर सीताफळामुळे तेही कमी होण्यास मदत होते. प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी सीताफळ फायदेशीर असते, त्यामुळे तुम्हाला PCOD ची समस्या असेल तरी तुम्ही सिताफळ खायला हवे.   

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यपौष्टिक आहार