Join us

हवा बदलल्याने कोरडा खोकला, सर्दी-कफ झालाय? घरीच करा १ सोपा काढा, मिळेल आराम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2024 13:47 IST

Easy home remedy for cough and cold : या सर्दी-कफाने किंवा खोकल्याने अनेकदा इतके अस्वस्थ होते की काय करावे ते कळत नाही...

सध्या थंडी कमी होऊन उकाडा वाढण्याचा कालावधी आहे. संक्रांत झाल्यावर साधारणपणे हवेतील गारवा कमी होतो आणि तापमानाचा पारा चढतो. दिवसा कडक ऊन आणि पहाटे व रात्री एकदम गारठा असे हवामान असल्याने सर्दी-कफाच्या समस्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना कोरडा खोकला, कफ, वाहणारे नाक यांसारख्या समस्या भेडसावत असल्याचे चित्र आहे. सर्दी ही अशी समस्या आहे की त्यासाठी आपण लगेच डॉक्टरांकडे जात नाही. पण या सर्दी-कफाने किंवा खोकल्याने अनेकदा इतके अस्वस्थ होते की काय करावे तेही आपल्याला कळत नाही (Easy home remedy for cough and cold). 

मग आपण वाफ घेणे, गरम पाण्याच्या गुळण्या करणे असे घरगुती उपाय करतो. पण त्याचा म्हणावा तसा फायदा होतोच असे नाही. अशावेळी घरच्या घरी अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून आयुर्वेदीक काढा केला तर त्याचा सर्दी कमी होण्यासाठी नक्कीच चांगला उपयोग होतो. हा काढा कसा करायचा याबाबत प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे माहिती दिली असून पाहूया हा काढा कसा करायचा...

काढा कसा करायचा? 

तुळशीची ५ पाने घ्यायची, ५ काळी मिरी आणि अर्धा चमचा सुंठ पावडर व २ चिमूट हळद साधारणपणे ४ कप पाण्यात चांगले उकळायचे. हे पाणी १ कप होईपर्यंत उकळल्यास यातील औषधी गुणधर्म पाण्यात मिसळण्यास मदत होते. उकळल्यानंतर हा काढा गाळणीने गाळून घ्यायचा आणि त्यामध्ये अर्धा चमचा गूळ घालून हा काढा प्यायचा. गरमागरम काढा प्यायल्याने नक्कीच घशाला आराम मिळण्यास, सर्दी आणि कफ कमी होण्यास मदत होते. दिवसातून २ ते ३ वेळा तुम्ही हा काढा घेऊ शकता.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 

काही जणांना दर काही दिवसांनी सर्दी आणि खोकला होतो. असे होत असेल तर आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याची आश्यकता आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी सुंठ, गूळ आणि तूप या तिन्ही गोष्टी एकत्र करुन त्याच्या लहान आकाराच्या गोळ्या तयार करायच्या. सकाळी २ आणि रात्री २ अशा या गोळ्या जाता येता खाल्ल्या तरी सतत होणारी सर्दी कफाची समस्या नियंत्रणात येण्यास मदत होते. लहान मुलांनाही या गोळ्या देऊ शकतो मात्र त्यांना कावेळी २ न देता एकच गोळी द्यायला हवी. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडी