कडीपत्ता हा आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा घटक असून त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. फोडणीत कडीपत्ता घातल्यावर वास छान येतो, चव छान येते म्हणून हा कडीपत्ता वापरतातच.मात्र कडीपत्त्यात जीवनसत्त्व ए, बी, सी, ई मुबलक प्रमाणात असतात. तसेच कडीपत्यात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्सही मोठ्या प्रमाणावर असतात. हे घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि रक्तशुद्धी करण्यास मदत करतात. पचनसंस्थेवरील ताण कमी करुन अन्न सहज पचण्यास मदत करणारे गुणधर्म कडीपत्त्यात आहेत. लोहामुळे अॅनिमिया टाळण्यास मदत होते, तर अँटी ऑक्सिडंट्समुळे केस गळणे कमी होते आणि पांढरे केस वाढत असतील तर त्याचे प्रमाणही कमी होते. कडीपत्त्याचा नियमित वापर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त मानला जातो. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी तो फायदेशीर ठरतो.
कडीपत्ता वापरण्याचे अनेक मार्ग आहेत. स्वयंपाक करताना फोडणीत कडीपत्ता आपण रोज घालतोच. भाज्यांना, आमटीला किंवा इतर पदार्थांना खास चव आणि सुगंध यावा म्हणून तो वापरला जातो. मात्र सकाळी काही ताजी कडीपत्त्याची पाने चघळल्याने पचन सुधारते आणि तोंडाचा वास गायब होतो.
कडीपत्त्याचा रस काढून प्यायल्याने केस आणि त्वचेसाठी पोषण मिळते. कधी कधी कडीपत्ता वाळवून त्याची पूड करून भात, दहीभात किंवा चटणीत मिसळूनही खाल्ली जाते. कडीपत्याची पूड तसेच चटणी चवीला जेवढी चांगली असते त्याहून जास्त आरोग्यासाठी फायद्याची असते.
कडीपत्याचे तेल घरीच तयार करा. अगदी सोपे आहे. खोबरेल तेलात कडीपत्ता उकळायचा आणि त्याचे तेल करायचे. केसांसाठी हे तेल फार औषधी ठरते. कडीपत्यामुळे केस गळणे एकदम कमी होते. कोंडाही कमी होतो.
कडीपत्ता नुसता चावून खायला आवडत नसेलत तर त्याचा वापर करण्याचा विविध पद्धती नक्की करुन पाहा. चटणी करुन खा तसेच पाने भाजून त्याची पूड करा आणि ती पूड खा. थेट केसांवर कडीपत्याचा लेप लावा. चेहऱ्यालाही लावा. अशा प्रकारे कडीपत्ता नक्की वापरा.