Gum Disease : बऱ्याच लोकांना हिरड्यांना सूज किंवा त्यातून रक्त येण्याची समस्या असते. पण जास्तीत जास्त लोक एक सामान्य समस्या समजून याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, असं करणं घातक ठरू शकतं. कारण हॉर्वर्ड हेल्थच्या एका रिपोर्टनुसार, तोंडातील बॅक्टेरिया जर जास्त वेळ सक्रिय राहिले, तर शरीरात सूज वाढून हृदयरोगाचा (Heart Disease) धोका वाढू शकतो.
जेव्हा हिरड्यांमध्ये पुन्हा पुन्हा सूज येते, त्यातून रक्त येतं किंवा इन्फेक्शन होत असेल तर बॅक्टेरिया ब्लडस्ट्रीमच्या माध्यमातून शरीरात पसरू शकतात, असं डॉ. सुमन यादव सांगतात. तसेच सूज आल्यानं धमण्या कठोर होणं आणि हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो.
हिरड्यांची समस्या आणि हृदयरोगाचं नातं
रिपोर्टनुसार, सूज आणि इन्फेक्शननं शरीरात सतत सूज राहते. जेव्हा बॅक्टेरिया रक्तात मिक्स होतात, तेव्हा शरीराची इम्यून सिस्टीम रिअॅक्ट करते, ज्यामुळे धमण्यांवर सूज येऊ शकते. हीच सूज हळूहळू प्लाक बनवून रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करते. ज्यामुळे हार्ट अॅटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.
कशी ओळखाल हिरड्यांच्या समस्येची लक्षणं
हिरड्यांचा आजार हळूहळू वाढतो आणि याची लक्षणंही सामान्य असतात. ज्यामुळे लोक त्यांकडे दुर्लक्ष करतात. लक्षणांमध्ये ब्रश करताना रक्त येणे, हिरड्यांमध्ये वेदना आणि सूज, श्वासाची दुर्गंधी, दात सैल होणं किंवा हिरड्या मागे सरकणं इत्यादींचा समावेश आहे. जर ही लक्षणं जास्त दिवस राहिली तर जिंजिवायटिस किंवा पीरियोडोंटायटिसचे संकेत असू शकतात. ज्यामुळे हृदयरोगांचा धोका वाढू शकतो.
कुणाला जास्त धोका?
जर आपल्याला डायबिटीस असेल, स्मोकिंग करत असाल किंवा आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असेल तर हिरड्यांच्या आजारामुळे हृदयाला अधिक धोका होऊ शकतो. तसेच वृद्ध, हाय ब्लड प्रेशर आणि जे लोक तोंडाची योग्य स्वच्छता करत नाहीत त्यांना हा धोका अधिक असतो.
हिरड्यांच्या काळजीनं टळू शकतो धोका
आपले दात आणि हिरड्यांची रोज स्वच्छता केल्यास हृदयरोगाचा धोका टाळता येऊ शकतो. यासाठी दिवसातून दोनदा ब्रश करा, फ्लॉसचा वापर करा आणि दर ६ महिन्यांनी दातांची तपासणी करा. तेलकट, गोड आणि चिकट पदार्थ कमी खा आणि पाणी भरपूर प्या. जर हिरड्यांवर सूज असेल, रक्त येत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.