दात दुखणे ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. विशेषतः गोड पदार्थ खाल्ल्यानंतर दातात ठणका जाणवणे किंवा चावतानाच वेदना होणे हे दातांच्या आरोग्याशी संबंधित काही बिघाडाचे लक्षण असते. गोड खाल्ल्यानंतर होणारा हा त्रास केवळ संवेदनशीलतेमुळेच नाही तर दातांमध्ये असलेल्या किडीमुळे, हिरड्यांच्या सूजेमुळे किंवा दाताच्या इनेमलच्या झीजेमुळेही होऊ शकतो. (Do your teeth hurt after eating anything sweet? See how to take care of your teeth, what to do and what to avoid)अनेक वेळा लोक या वेदनांकडे दुर्लक्ष करतात, पण ही लक्षणे पुढे मोठ्या त्रासाचे रुप घेऊ शकतात. म्हणूनच याची कारणे जाणून घेणे आणि घरच्या घरी होणारे सोपे उपाय करुन पाहणे आवश्यक आहे.
गोड पदार्थांतील साखर तोंडातील जीवाणूंशी मिळून आम्ल तयार करते. हे आम्ल दातांचा बाह्य थर म्हणजेच इनेमल हळूहळू झिजवते आणि त्या ठिकाणी छोटे छिद्र तयार होतात. हाच टप्पा म्हणजे दात किडण्याची सुरुवात. दातांची संवेदनशीलता वाढली की थंड, गरम किंवा गोड पदार्थ खातानाच वेदना जाणवतात. काही वेळा हिरड्या मागे सरकल्यानेही दातांचे मुळ भाग उघडे पडतात आणि त्यातूनही दुखणे जाणवते.
दात दुखण्यावर काही घरगुती उपाय अगदी प्रभावी ठरतात. कोमट पाण्यात मीठ घालून दिवसातून दोन-तीन वेळा गुळण्या केल्यास तोंडातील सूज कमी होते आणि जीवाणू नष्ट होतात. लवंग तेल हा एक जुना आणि खात्रीशीर उपाय आहे. कापसाच्या बोळ्यावर काही थेंब लवंग तेल घेऊन दुखऱ्या दातावर ठेवल्यास तात्काळ आराम मिळतो. तसेच हळदीचा लेप लावल्यास दात आणि हिरड्यांतील सूज कमी होते. लसूणमध्ये असलेले जंतुनाशक गुणधर्म वेदना कमी करण्यास मदत करतात.
जर दातात खूप ठणका जाणवत असेल किंवा सूज आली असेल, तर गालावर थंड पाण्याचा कपडा ठेवावा. त्यामुळे सूज कमी होऊन वेदना हलक्या होतात. दात निरोगी ठेवण्यासाठी दररोज दोन वेळा दात घासणे, गोड पदार्थ खाल्ल्यानंतर तोंड धुणे आणि फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट वापरणे हे अत्यंत आवश्यक आहे. तसेच काही काळाने दंतवैद्याकडे तपासणी करुन घेणे फार गरजेचे असते.
जर दात सतत दुखत असतील , दात हलत असतील, हिरड्यांतून रक्त येत असेल किंवा सूज वाढत असेल तर तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. घरगुती उपाय तात्पुरता आराम देतात, पण योग्य उपचार केले तरच दातांचे आरोग्य दीर्घकाळ टिकवता येते.
