हाताच्या तळव्याला घाम येणे ही समस्या अनेकांना भेडसावते. काही लोकांच्या तळव्यावर इतका घाम येतो की हातातून वस्तू सटकतात, पेन धरायला अडचण होते, मोबाइल वापरताना त्रास होतो. कोणाला हॅण्डशेक करणेही कठीण होते. इतका घाम हाताला येतो. वैद्यकीय भाषेत या समस्येला 'पामर हायपरहायड्रोसिस' असे म्हणतात.
या समस्येमागे अनेक कारणे असतात. शरीरातील उष्णता वाढल्यामुळे, जास्त ताण, भीती, चिंता किंवा मानसिक तणाव आल्यास घाम येण्याचे प्रमाण वाढते. (Do your palms sweat? Is this normal or a sign of a serious illness? Learn simple home remedies)काही वेळा ही समस्या परिवारात अनेकांना असते. ती तशीच पुढच्या पिढीकडे जाते. तसे नसताना मात्र आहारातील चुका हे सर्वात सामान्य कारण मानले जाते. जास्त तेलकट, मसालेदार, शरीरासाठी गरम ठरणारे पदार्थ, कॉफी, चहा किंवा कोल्डड्रिंक यांचा वापर शरीरात उष्णता वाढवतो आणि त्यामुळे तळव्यावर अधिक घाम येतो. या त्रासावर काही सोपे आणि घरगुती उपाय करुन आराम मिळू शकतो.
पहिला उपाय म्हणजे हात नेहमी कोरडे ठेवण्यासाठी सोबत कॉटनचा रुमाल ठेवा. रुमाल किंवा टिश्यू जवळ ठेवून हात वारंवार पुसत राहा. पाण्याने हात धुतल्यावर नीट कोरडे करणे आवश्यक आहे. दुसरा उपाय म्हणजे थंड पाण्याने हात धुणे. दिवसातून दोन-तीन वेळा थंड पाण्याने हात धुतल्यास घामग्रंथी शांत होतात आणि घाम कमी येतो.
तिसरा उपाय म्हणजे बेकिंग सोड्याचा वापर. थोडा बेकिंग सोडा पाण्यात मिसळून त्या पाण्यात काही मिनिटे हात बुडवून ठेवावेत. यामुळे घाम येण्याचे प्रमाण कमी होत नाही मात्र हाताला येणारी दुर्गंधी कमी होते. चौथा उपाय म्हणजे आहारात काही महत्त्वाच्या सुधारणा करणे. तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करुन फळे, भाज्या, दही, आणि भरपूर पाणी पिणे सुरु करा. यामुळे शरीरातील तापमान संतुलित राहते.
पाचवा उपाय म्हणजे ताणतणाव कमी करणे. ध्यान, श्वसनाचे व्यायाम किंवा फिरायला जाणे यामुळे मन शांत राहते आणि घामाचे प्रमाण कमी होते. हाताला पायाला येणाऱ्या घामाचा संबंध मानसिक आरोग्याशीही असतो. त्यामुळे काळजी घेणे कधीही उत्तम. हाताच्या तळव्याला येणारा घाम हा जरी गंभीर आजार नसला तरी दैनंदिन जीवनात त्रासदायक ठरतो. योग्य आहार, स्वच्छता आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतल्याने हा त्रास हळूहळू कमी होतो. नियमित काळजी घेतल्यास हात कोरडे राहतात आणि आत्मविश्वासही वाढतो.