हातपाय आखडणे म्हणजे अचानक स्नायूंमध्ये जाणवणारी वेदना. अनेकदा झोपेत, चालताना किंवा एखादे काम करत असताना हात-पाय आखडतात आणि क्षणभर हालचालही करता येत नाही. ही समस्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही होऊ शकते. यामागे काही दैनंदिन सवयी आणि आरोग्याशी संबंधित कारणे असतात. थंडीत अंग आखडण्याचे प्रमाण जास्त असते. स्नायू आखडतात आणि त्यामुळे थकवा, आळस जाणवतो आणि अंगदुखी होते. (Do your limbs feel stiff? Don't feel like doing anything, just sitting around? happens due to 'this' deficiency in your body.)
हातपाय आखडण्याचे प्रमुख कारण म्हणजे शरीरात पाणी कमी होणे. घाम जास्त येतो, पण पाणी पुरेसे प्यायले जात नाही, तेव्हा स्नायूंना आवश्यक असलेले क्षार कमी पडतात आणि आखडणे सुरू होते. कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारख्या खनिजांची कमतरताही याला कारणीभूत ठरते. विशेषतः दूध, डाळी, हिरव्या भाज्या, फळे कमी खाल्ल्यास अशी कमतरता जाणवते.
जास्त वेळ एकाच स्थितीत बसणे किंवा उभे राहणे हेही एक महत्त्वाचे कारण आहे. ऑफिसमध्ये सतत बसून काम करणारे, प्रवासात तासन्तास बसणारे किंवा उभ्याने काम करणाऱ्यांना हातपाय आखडण्याचा त्रास जास्त होतो. अचानक जास्त व्यायाम करणे किंवा शरीराला सवय नसताना मेहनतीचे काम केल्यासही स्नायू ताणले जातात आणि आखडतात. रक्ताभिसरणाशी संबंधित समस्या, मज्जासंस्थेचे विकार, थायरॉईडचा त्रास, मधुमेह अशा काही आजारांमुळेही हातपाय आखडण्याची तक्रार केली जाते. हातपाय आखडू नयेत यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे पाणी पुरेसे पिणे. दिवसातून थोड्या-थोड्या वेळाने पाणी प्यायल्यास शरीरातील क्षार संतुलित राहतात. आहारात दूध, दही, ताक, डाळी, भाजीपाला, केळी, संत्री यांचा समावेश करणे फायदेशीर ठरते. रोज हलका व्यायाम, चालणे आणि स्ट्रेचिंग केल्यास स्नायू लवचिक राहतात आणि आखडण्याची शक्यता कमी होते. जास्त वेळ बसून किंवा उभे राहून काम करत असाल तर मधून-मधून हालचाल करणे गरजेचे आहे. झोपण्यापूर्वी पायांना हलका मसाज करणे किंवा कोमट पाण्याने अंघोळ करणे उपयुक्त ठरते. अचानक आखडल्यास त्या भागाला हळूवार ताण देणे आणि श्वासोच्छ्वास नियंत्रित ठेवणे आराम देते.
जर हातपाय आखडण्याचा त्रास वारंवार होत असेल, वेदना जास्त असतील किंवा त्यासोबत सुन्नपणा, सूज किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य तपासणी आणि उपचार केल्यास ही समस्या नियंत्रणात येऊ शकते. थोडी काळजी, संतुलित आहार आणि योग्य दिनचर्या हातपाय आखडण्याचा त्रास नक्कीच कमी करतात.
