आपण रोज बरेच वेळा हातपाय धुतो, पण फक्त पाणी किंवा साबण लावून पटकन धुणे म्हणजे खऱ्या अर्थाने स्वच्छता झालीच असे नाही. हातपायांवरुन अनेक जंतू, धूळ, माती आणि घाण शरीरात प्रवेश करू शकते. (Do you wash your hands and feet perfectly? a serious cause of recurring illnesses and infections.)त्यामुळे आजार टाळण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी हातपाय नीट, व्यवस्थित स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे. हातपाय फक्त धुणे पुरेसे नसते, त्यामागे योग्य पद्धत आणि नियमित सवयीही तितक्याच महत्त्वाच्या असतात.
हातपाय व्यवस्थित स्वच्छ का ठेवावे?
हात सतत तोंड, डोळे, नाक यांच्याशी संपर्कात येतात, तर पाय जमिनीवरच्या धूळ-माती, घाम आणि जंतूंशी. स्वच्छता नीट न राखल्यास त्वचेचे संसर्ग, खाज, फंगल इन्फेक्शन, पोटाचे आजार तसेच थकवा आणि दुर्गंधी यांसारखे त्रास होऊ शकतात. म्हणूनच हातपायांची स्वच्छता ही केवळ सवय नसून आरोग्याची गरज आहे.
हातपाय स्वच्छ ठेवण्यासाठी उपयुक्त टिप्स
नखांतील घाण नियमित काढा
नखांच्या आत घाण साचण्याची शक्यता जास्त असते. ही घाण सहज डोळ्यांना दिसत नाही, पण ती जंतूंचा मोठा स्रोत असू शकते. आठवड्यातून एकदा नखे कापा आणि नखांखालील भाग हलक्या ब्रशने किंवा मऊ काडीने स्वच्छ करा. हात धुताना नखांवर साबण लावून चोळणे विसरु नका.
हात धुताना फक्त तळहात नव्हे तर बोटांच्या मधल्या जागा स्वच्छ करा
बहुतेक वेळा आपण तळहात पटकन धुऊन घेतो, पण बोटांमधील जागा, अंगठा आणि मनगट दुर्लक्षित राहतात. या ठिकाणीही जंतू राहू शकतात. त्यामुळे हात धुताना किमान २० सेकंद सर्व भाग स्वच्छ करा.
तळव्यांचा नियमित वापर आणि स्वच्छता महत्त्वाची
पायांचे तळवे दिवसभर वजन सहन करतात आणि घाम, धूळ यामुळे लवकर मळतात. दररोज संध्याकाळी किंवा रात्री कोमट पाण्याने पाय धुणे उपयुक्त ठरते. आठवड्यातून २–३ वेळा तळव्यांवरील मृत त्वचा हलक्या पद्धतीने काढल्यास भेगा, दुर्गंधी आणि जंतुसंसर्ग टाळता येतो. त्यासाठी तळवे स्वच्छ करण्याची घासणीही मिळते. तिचा वापर करा.
पाय कोरडे ठेवायची सवय लावा
पाय धुतल्यानंतर नीट कोरडे न केल्यास ओलावा राहतो आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. विशेषतः बोटांच्या मधली जागा टॉवेलने नीट पुसा. मोजे घालण्यापूर्वी पाय पूर्ण कोरडे आहेत याची खात्री करा.
साबण आणि पाण्याचा योग्य वापर करा
अतिशय कडक साबण वापरल्यास त्वचा कोरडी पडू शकते. सौम्य साबण वापरा आणि गरजेपेक्षा जास्त वेळ हातपाय पाण्यात भिजवून ठेवू नका. स्वच्छतेनंतर हलका मॉइश्चरायझर लावल्यास त्वचा निरोगी राहते.
