Join us
Daily Top 2 Weekly Top 5

दुपारी झोपायला आवडते ? आराम की आजार ? पाहा कोणी झोपावे आणि कोणी टाळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2026 12:03 IST

Do you like to sleep in the afternoon? Find out who should sleep and who should avoid it : दुपारची झोप आरोग्यासाठी ठरते वाईट. पाहा कोणी झोपावे आणि कोणी नाही.

भारतीय जीवनशैलीत दुपारी थोडी झोप घेण्याची सवय अनेक ठिकाणी आढळते. काहींना ती फार आरामदायक वाटते, तर काहींना दुपारी झोप घेतल्यावर जडपणा, आळस किंवा पचनाचे त्रास जाणवतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहीले, तर दुपारी झोपणे सर्वांसाठीच योग्य नसते. कोणासाठी ती लाभदायक ठरते आणि कोणासाठी टाळावी लागते, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. (Do you like to sleep in the afternoon? Find out who should sleep and who should avoid it.)आयुर्वेदानुसार दुपारचा काळ हा मुख्यतः पित्त दोषाचा काळ मानला जातो. या वेळेत पचनशक्ती तीव्र असते. अशा वेळी झोप घेतली, तर पचनक्रिया मंदावते आणि शरीरात पित्त वाढण्याची शक्यता असते. पित्त वाढल्यामुळे अंगावर उष्णता जाणवणे, छातीत जळजळ, आम्लपित्त, डोकेदुखी, त्वचेवर पुरळ किंवा मुरुम वाढणे असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे सर्वसाधारणपणे निरोगी व्यक्तींनी रोजची सवय म्हणून दुपारी झोप टाळावी असे आयुर्वेद सांगते.

काही विशिष्ट परिस्थितींमध्ये दुपारी झोप उपयुक्त ठरू शकते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, आजारपणातून बरे होत असलेले रुग्ण, अतिशय शारीरिक श्रम करणारे लोक किंवा ज्यांची रात्रीची झोप अपुरी होते, अशांसाठी थोडीशी दुपारची झोप शरीराला ऊर्जा देणारी ठरते. नाईट शिफ्ट करणार्‍यांसाठी तर ही झोप फार महत्त्वाची असते. उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये शरीर थकते, उष्णतेमुळे दमछाक होतो. अशा वेळी अगदी अल्प वेळाची झोप काही प्रमाणात आराम देऊ शकते. मात्र ही झोप फार वेळेची नसावी. जास्त वेळ झोपल्यास शरीरात कफ वाढतो. त्यामुळे आळस, जडपणा, पोट फुगणे, पचन मंदावणे आणि वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते. विशेषतः ज्यांना आधीच आम्लपित्त, स्थूलपणा, मधुमेह, थायरॉईड किंवा त्वचारोगांचा त्रास आहे, त्यांनी दुपारी झोप घेणे टाळणे अधिक योग्य ठरते.

दुपारी झोपण्याचे तोटे हळूहळू शरीरावर दिसू लागतात. सतत दुपारी झोप घेतल्याने रात्री झोप लागत नाही. झोपेचे नैसर्गिक चक्र बिघडते, त्यामुळे थकवा आणि चिडचिड वाढते. पचनशक्ती कमी झाल्यामुळे गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता यांसारखे त्रास होऊ शकतात. काही जणांना दुपारी झोप घेतल्यावर उठताना डोके जड वाटणे किंवा आळस न जाणे असा अनुभव येतो. मानसिक दृष्ट्याही दुपारी झोपेचा अतिरेक चांगला मानला जात नाही. आळशीपणा वाढणे, कामात लक्ष न लागणे आणि दिनचर्येत उत्साह कमी होणे हे दुष्परिणाम दिसून येतात. दीर्घकाळ ही सवय राहिली, तर शरीराची कार्यक्षमता कमी होऊ शकते.

म्हणूनच दुपारी झोप घ्यायचीच असेल, तर ती गरजेनुसार आणि मर्यादित असावी. पूर्ण झोप घेण्याऐवजी डोळे बंद करून थोडा वेळ शांत बसणे, पाय सरळ करुन विश्रांती घेणे किंवा ध्यान करणे हे अधिक फायदेशीर ठरते. एकूणच, दुपारी झोपणे हे सर्वांसाठी एकसारखे योग्य नाही. व्यक्तीची प्रकृती, वय, ऋतू आणि जीवनशैली यानुसार त्याचा निर्णय घ्यावा लागतो. आयुर्वेद सांगते त्याप्रमाणे, शरीराच्या संकेतांकडे लक्ष दिले आणि अतिरेक टाळला, तर आरोग्य संतुलित राहते.

English
हिंदी सारांश
Web Title : Afternoon naps: Healthy habit or harmful? Who should avoid it?

Web Summary : Ayurveda suggests afternoon naps aren't for everyone. Beneficial for some, like children or laborers, they can harm others by disrupting digestion and sleep cycles, potentially leading to health issues. Moderation is key.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीसोशल व्हायरल