Join us
Daily Top 2 Weekly Top 5

कान साफ करण्याची योग्य पद्धत माहित आहे का ? एक चूकही ठरेल कानासाठी धोक्याची , बहिरेपणा टाळा वेळीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2026 16:41 IST

Do you know the correct way to clean your ears? never do these things : कान साफ करताना अजिबात करु नका या चुका.

शरीराची स्वच्छता राखताना अनेक जण कान साफ करण्याकडे विशेष लक्ष देतात. काही लोक रोज कान साफ करतात. तर त्याउलट अनेकांना कानही साफ करायला हवा हे लक्षातच राहत नाही. मग कानात मळ जमा झाला की अस्वस्थ वाटू लागते त्यानंतर कान साफ करायला हवा याची जाणीव होते. (Do you know the correct way to clean your ears? never do these things )कान रोज खरडवून साफ करणे आणि साफच न करणे दोन्ही खरंतर कानासाठी वाईट. कान साफ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.  

कानात तयार होणारा earwax हा शरीरासाठी वाईट नसतो. उलट तो कानाचे संरक्षण करण्याचे काम करतो. धूळ, घाण किंवा बॅक्टेरिया आत जाण्यापासून तो अडवतो. तसेच कानातील त्वचा कोरडी पडू नये यासाठीही मदत करतो. मात्र काही वेळा हा मळ जास्त प्रमाणात जमा झाला तर ऐकण्यात अडथळा येणे, कान बंद झाल्यासारखे वाटणे, खाज येणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते. अशावेळी कान स्वच्छ करणं गरजेचं ठरतं. त्यामुळे रोज इअरवॅक्स काढत बसणे चांगले नाही.

अनेक लोक कान साफ करण्यासाठी कॉटन बड्स वापरतात. ही सर्वात सामान्य पण चुकीची सवय मानली जाते. कारण कॉटन बड्सने मळ बाहेर येण्याऐवजी तो अधिक आत ढकलला जाऊ शकतो. त्यामुळे कान बंद होणे किंवा इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. काही लोक हेअरपिन, मॅचस्टिक, किल्ली किंवा इतर टोकदार वस्तूंनी कान साफ करतात. ही सवय अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कानाच्या आतल्या नाजूक त्वचेला जखम होऊ शकते किंवा कानाच्या पडद्यालाही इजा पोहोचू शकते. काही लोकांना कानात थोडी खाज आली तरी सतत कान कुरवाळण्याची सवय असते. पण वारंवार कानात वस्तू घातल्याने त्रास वाढू शकतो. तसेच कानावर कोणतेही तेल, औषध किंवा घरगुती उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करणेही टाळायला हवे. प्रत्येकाच्या कानाची स्थिती वेगळी असते आणि चुकीच्या उपायांमुळे त्रास वाढू शकतो.

कान साफ करण्याची योग्य पद्धत खूप साधी आहे. सामान्यतः कान स्वतःच मळ बाहेर टाकण्याचे काम करतात. त्यामुळे वारंवार आतपर्यंत साफ करण्याची गरज नसते. बाहेरील भाग स्वच्छ कापडाने हलक्या हाताने पुसणे पुरेसे असते. जर कानात खूप मळ साचला असेल, ऐकायला त्रास होत असेल किंवा कान बंद झाल्यासारखे वाटत असेल तर ENT डॉक्टरांकडून साफ करून घेणे अधिक सुरक्षित ठरते.

कानांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण ऐकण्याची क्षमता आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी आवश्यक असते. चुकीच्या सवयींमुळे छोटासा त्रासही मोठ्या समस्येत बदलू शकतो. त्यामुळे कान साफ करताना घाई किंवा चुकीचे प्रयोग करण्याऐवजी योग्य काळजी घेणं आणि सुरक्षित पद्धती वापरणं अधिक महत्त्वाचं ठरतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Proper ear cleaning prevents hearing loss; avoid dangerous methods.

Web Summary : Earwax protects; excessive cleaning harms. Avoid cotton swabs, sharp objects. Gentle outer cleaning suffices. For blockage, consult an ENT doctor. Protect hearing by adopting safe practices.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यहोम रेमेडीसोशल व्हायरल