गुडघेदुखी हा एक सामान्य पण फार त्रासदायक प्रकार आहे. वय वाढल्यावर उठताना-बसताना गुडघ्यात वेदना जाणवणे ही अगदीच सामान्य समस्या आहे, मात्र तरुणांनाही हा त्रास होऊ शकतो. गुडघेदुखीची प्रमुख कारणे म्हणजे हाडांमधील कॅल्शियम आणि जीवनसत्त्व 'डी' ची कमतरता ही दोन मुख्य कारणे आहेत. सांध्यांचा त्रास, लठ्ठपणा, सतत उभं राहणं किंवा चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणं, अपघातामुळे झालेली इजा, सांध्यांमध्ये सूज किंवा संधिवातासारखे आजार या साऱ्यामुळे गुडघे दुखतात. चुकीच्या आहारामुळे, पचनाच्या तक्रारींमुळे किंवा शरीरातील पाणी कमी झाल्यामुळेही गुडघ्यांच्या सांध्यांमध्ये वेदना होतात.
गुडघेदुखीवर घरगुती उपाय अनेक आहेत. सर्वप्रथम आहारात कॅल्शियम, जीवनसत्त्व 'डी' आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. दूध, दही, तूप, हळद, हिरव्या पालेभाज्या आहारात असाव्या. बदाम, अक्रोड, तीळ यासारखे पदार्थ गुडघ्यांना बळकट करतात. हलका व्यायाम, योगासने आणि चालणे हे सांध्यांची हालचाल सुरळीत ठेवतात. गुडघ्यांवर गरम पाण्याची पट्टी ठेवली तर स्नायू मोकळे होतात आणि वेदना कमी होते. काही वेळा सूज असल्यास थंड पाण्याची पट्टीही फायदेशीर ठरते. हळदीचे दूध, लसूण किंवा आलं यांचा आहारात वापर केला तर शरीरातील सूज कमी होण्यास मदत मिळते.
तीळाच्या तेलाने मालीश करणे अगदी आरामदायी ठरते. त्याच प्रमाणे नारळाच्या तेलाने हलक्या हाताने मालीश केल्यास रक्तप्रवाह सुधारतो आणि वेदना कमी होतात. बदामाचे तलही फायद्याचे असते. गुडघ्यांवर शरीराचा ताण येऊन हा त्रास वाढतो. त्यामुळे तेलाने आराम मिळतो.
जास्त वजन असेल तर ते कमी करणे महत्त्वाचे आहे. कारण वजनामुळे गुडघ्यांवर अधिक ताण पडतो. बसताना-झोपताना आधार घेणे, पाय गुडघ्याखाली दुमडून जास्त वेळ बसणे टाळा. योग्य पोश्चर ठेवणे यामुळे गुडघ्यांना आराम मिळतो. घरगुती उपायांनीही त्रास कमी न झाल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक तपासण्या करुन उपचार घेणे गरजेचे आहे.