कान हा एक फार नाजूक अवयव आहे. कानाचे दुखणे अगदी नको वाटते. कारण कान आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्यामुळे कान दुखत असला की नक्की काय होत आहे हे आपल्याला स्वत:हून पाहता येत नाही. त्यामुळे चिडचिडही होते. कान दुखत असेल तर काय करावे काय नाही काहीच सुचत नाही. सारखे लक्ष कानाकडे जाते. कान दुखणेही अगदी सामान्य समस्या आहे मात्र काही वेळा कानाला जबरदस्त ठणका लागतो. कान एकदा ठणकायला लागला की डॉक्टरही पेनकिलर्स देतात. कारण कान फारच जास्त त्रास देतो. त्यामुळे कान दुखी ही अत्यंत सामान्य समस्या असली तरी त्रासदायक आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही कधीही कानाचा त्रास होऊ शकतो. कानदुखी असेल तर दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण करते. मन थाऱ्यावर राहत नाही.
कान दुखण्यामागे विविध कारणे असू शकतात. काही कारणे फार सामान्य आहेत.
१. काही वेळा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे कानाच्या मध्यभागी सूज येते. एखाद्या व्हायरसच्या संसर्गामुळेही असे होऊ शकते. कानाला सूज आली की वेदना होतात. असा त्रास असेल तर लगेच वैद्य गाठायचा. कानाचे दुखणे वाढत जाते. वाढायला फार वेळही लागत नाही.
२. कानात सारखा मळ साचतो. असे होणे नैसर्गिक आहे. मात्र मळ प्रमाणाबाहेर असेल आणि कानात अडकून राहत असेल तर कानातील मळ त्रासदायक ठरु शकतो. त्यामुळे कान रोज अंघोळ करताना साफ करायचा. स्वच्छ करायचा सेच कान कसा साफ करावा यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
३. अनेकदा दाताचा काही त्रास असेल तर लगेच कान दुखायला लागतो. दात दुखत असेल तर आपसुकच कानही दुखायला लागतो. त्यामुळे दात घसा या अवयवांची फार काळजी घ्यायची.
४. कान साफ करण्यासाठी कोणतीही हाताला लागेल ती वस्तू वापरणे बंद करा. कानात कोणतीही वस्तू घालू नका. पिनेने कान साफ करणारे अनेक जण आहेत. पिनेमुळे कानाचा पडदा कायमचा जाऊ शकतो. त्यामुळे कानात काहीही घालायचे नाही.