डोकेदुखी ही प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी एक सामान्य पण अत्यंत त्रासदायक समस्या आहे. डोकं ठणकतं, डोळ्यांसमोर काळोखी येते. कामावर लक्ष केंद्रित होत नाही आणि मूड पूर्णपणे बिघडतो. या वेदनेची कारणं वेगवेगळी असतात. (Do you have a headache? Check out simple traditional home remedies, find out the cause of your headache)सततची मानसिक ताणतणावाची अवस्था, झोपेचा अभाव, दिवसभरात पाणी कमी पिणे, मोबाईल-कम्प्युटर स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणे, चुकीचा आहार किंवा पोटातील त्रास ही डोकेदुखीची सामान्य कारणे ठरतात. कधी कधी हवामानातील बदल, जास्त आवाज किंवा थकवा यामुळेही डोकं जड होऊ लागतं. इतरही अनेक कारणे असतात. मात्र शक्यतो हीच कारणे असतात.
डोकेदुखीवर काही सोपे पण प्रभावी घरगुती उपाय नेहमीच उपयोगी पडतात. प्रथम म्हणजे भरपूर पाणी पिणे. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर डोकेदुखी लवकर जाणवते. त्यामुळे दिवसभरात वारंवार पाणी प्यावे. दुसरा उपाय म्हणजे आलं आणि मधाचं चाटण. थोडं आलं किसून त्याचा रस मधात मिसळायचा. हे चाटण आरोग्यासाठी फायद्याचे असते. ते घेतल्यावर डोकं हलकं होतं आणि स्नायूंनाही आराम मिळतो. तिसरा उपाय म्हणजे गरम पाण्याची पट्टी. मानेला आणि डोक्याच्या मागच्या भागावर गरम पाण्याची पट्टी ठेवायची आणि शेकायचे. त्यामुळे नक्कीच आराम मिळेल. तसेच रक्ताभिसरण सुधारेल आणि ताण कमी होऊन डोकेदुखी हळूहळू कमी होईल.
याशिवाय शांत वातावरणात थोडा वेळ डोळे मिटून विश्रांती घेणे, सौम्य संगीत ऐकणे किंवा श्वसनाचे साधे व्यायाम करणे हे ही फायद्याचे उपाय ठरतात. डोकेदुखीच्या वेदना केवळ औषधांनीच कमी होत नाहीत, तर या नैसर्गिक आणि साध्या पद्धतींनीही शरीराला दिलासा मिळतो. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप या गोष्टींनी डोकेदुखीपासून सुटका मिळवता येते. म्हणूनच, त्रास वाढण्याआधीच हे सोपे घरगुती उपाय करुन पाहावेत आणि डोकं हलकं, मन प्रसन्न ठेवावं. जास्त ताण घेणे बंद करा. त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आणि त्यामुळेही डोकं दुखतं.