खूप वेळासाठी एकाच स्थितीत बसणे, झोपणे किंवा अचानक उभे राहणे या कृती करताना चक्कर येते का? या कृती फार झपाट्याने केल्या की अनेकांना डोकं गरगरल्यासारखं होतं, दृष्टी धूसर होते किंवा काही क्षण पाय थरथरल्यासारखे वाटतात. (Do you feel dizzy? Do you lose your balance? There could be serious reasons behind it, ignoring it will be a problem.)ही अवस्था अचानक निर्माण होते आणि तेव्हाच मनात प्रश्नही येतो, हे नक्की का होतं?
खरं तर अशी चक्कर येणं अनेक कारणांनी होऊ शकतं. त्यातील सर्वात सामान्य म्हणजे ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन. आपण शांतपणे बसलेल्या किंवा झोपलेल्या अवस्थेतून पटकन उभे राहिल्यावर रक्तदाब क्षणभर खाली जातो. मेंदूपर्यंत पुरेसं रक्त न पोहोचल्यामुळे काही सेकंदांसाठी डोकं भिरभिरल्यासारखं होतं. हा त्रास बहुतेक वेळी काही क्षणांनी आपोआप कमी होतो, पण तो वारंवार होत असेल तर शरीरात द्रवांची कमतरता, खनिजे आणि मीठ कमी असणे किंवा थकवा यासारखी कारणे दडलेली असू शकतात.
अतिशय घाईत चालताना, कामाचा ताण असताना किंवा दिवसभर पुरेसे पाणी न पिता सतत धावपळ केल्यावरही चक्कर येण्याची शक्यता वाढते. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स बिघडले की मेंदू व स्नायू दोन्ही तत्काळ प्रतिक्रिया देतात. याशिवाय रक्तातील साखर कमी होणे, जास्त वेळ पोट रिकामं ठेवणे, पुरेशी झोप न मिळणे, डिहायड्रेशन, पाळीपूर्वच्या काळातील त्रास किंवा गरम वातावरणात बराच वेळ राहणे हीसुद्धा सर्वसामान्य कारणे आहेत. काही लोकांना साइनस, मायग्रेन किंवा अॅनिमिया असल्यासही अचानक उठताना - बसताना चक्कर येते.
कधी कधी मानसिक कारणेही शरीरावर त्वरित परिणाम करतात. ताण, चिंता, घाईत केलेली श्वासोच्छ्वासाची अनियमित पद्धत, एकदम धावणे किंवा दडपणाखाली काम करणे यामुळे शरीराचं संतुलन ढासाळतं आणि क्षणभर मेंदूला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने डोकं फिरायला लागतं. रोजच्या जीवनात या गोष्टी तितक्या नजरेत येत नाहीत, पण त्यांचा परिणाम शरीराला जाणवतो.
अचानक येणारी चक्कर सामान्य असली तरी ती वारंवार होत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. शरीराचा हा छोटासा इशारा असतो, आपण पुरेसं पाणी पीत नाही, झोप कमी होतेय, तणाव वाढलाय किंवा जेवणाच्या वेळेत अनियमितता वाढते आहे. कधी कधी हे लो हिमोग्लोबिन, थायरॉईड, बीपीच्या समस्यांचे पहिले संकेतही ठरू शकते.