सकाळी दात घासणे ही प्रत्येकाची रोजची सवय असते. कारण सकाळी उठल्यावर तोंडाला येणारा वास तसाच ठेवणे अजिबात शक्य नाही. मात्र रात्री झोपताना तोंडाला वास येत नाही. त्यामुळे दात घालण्याकडे कोणी फार लक्ष देत नाही. मात्र रात्री झोपताना दात घासणे फार महत्त्वाचे असते. (Do you brush your teeth at night before going to bed? Brushing your teeth twice a day is essential, dental health tips )दिवसभराच्या कामाची सुरुवात ताजेपणाने करणे महत्त्वाचे असते तसेच झोपतानाही दात स्वच्छ करणे गरजेचे असते. दिवसभर आपण जे काही खातो किंवा पितो त्याचे सूक्ष्म अंश, अन्नकण आणि तेलकटपणा आपल्या दातांवर जमा होतो. हिरड्यांच्या कडेवर आणि दातांमधल्या फटीत अन्न साचते. लाळेत असलेले नैसर्गिक जंतू या अन्नकणांमधील घटक दाताला लागतात आणि त्यातून चिकट थर म्हणजे प्लाक तयार होतो.
दिवसभर लाळेचे प्रमाण जास्त असल्याने तोंड स्वतःची काही प्रमाणात स्वच्छता करत असते. पण रात्री आपण झोपलो की लाळेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तोंड कोरडे राहते आणि जंतू वाढण्यास अनुकूल वातावरण तयार होते. जर आपण झोपण्याआधी ब्रश केला नाही तर हे जंतू अन्नातील साखरेवर प्रक्रिया करून आम्ल तयार करतात. हे आम्ल दातांच्या बाहेरील एनॅमलला हळूहळू झिजवते. ज्यामुळे दात किडणे, पोकळ होणे, संवेदनशीलता वाढणे किंवा दात तुटणे याचा धोका वाढतो. याशिवाय अन्नकण तोंडात रात्रभर राहिल्याने दुर्गंधी येते आणि हिरड्यांमध्ये सूज, रक्तस्त्राव किंवा संसर्गही होऊ शकतो.
रात्री ब्रश केल्याने दिवसभर साचलेला प्लाक आणि सारेच घटक काढता येतात. अन्नकण साफ होतात आणि जंतूंची वाढ थांबते. हे केवळ दातांसाठीच नव्हे तर हिरड्यांच्या आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त असते. दात किडणे किंवा हिरड्यांचे आजार हे दिर्घकाळ तसेच होत राहिले तर दातांच्याच नाही तर इतर अवयवांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. पचनसंस्थेवरही वाईट परिणाम होतो.
फक्त दोन मिनिटे रोज रात्री दात घासल्याने आपल्या दातांना आणि तोंडाला अनेक वर्षे निरोगी ठेवू शकतो. मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने सकाळी आणि झोपण्याआधी अशा दोन वेळा दात घासण्याची सवय कायम ठेवली, तर केवळ तोंडाचा ताजेपणाच नाही तर संपूर्ण दंत आरोग्यही उत्तम राहते.