Join us

Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 13:45 IST

Corona Virus : भारतातही कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे आरोग्य विभाग सावध झाला आहे.

हाँगकाँग आणि सिंगापूरसह आशियातील काही भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत, त्यामुळे आरोग्य संस्था सतर्क झाल्या आहेत. भारतातही कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे आरोग्य विभाग सावध झाला आहे. आरोग्य अधिकारी इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने (ILI) किंवा गंभीर तीव्र श्वसन संसर्गाने (SARI) ग्रस्त असलेल्या सर्व रुग्णांची COVID-19 साठी चाचणी करत आहेत.

१. बूस्टर डोस घेण्याची गरज आहे का?

मॅक्स हेल्थकेअरचे ग्रुप मेडिकल डायरेक्टर आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनल मेडिसिनचे वरिष्ठ डायरेक्टर डॉ. संदीप बुधिराजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपडेटेड कोरोनाचा बूस्टर जेएन१ संसर्गाविरुद्ध लक्षणीय संरक्षण प्रदान करतात. ते गंभीर आजार आणि रुग्णालयात दाखल होण्याचा धोका देखील लक्षणीयरीत्या कमी करतात. जेएन.१ साठी विशिष्ट लस अद्याप उपलब्ध नसल्या तरी आरोग्य तज्ञ कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी, वृद्धांसाठी आणि काही विशिष्ट प्रकरणांमध्ये बूस्टर डोसची शिफारस करू शकतात.

रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन आणि विश्वस्त डॉ. सायमन ग्रँट म्हणाले की, कोरोना संसर्गाने बाधित भागातील आरोग्य तज्ज्ञ उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींना खबरदारी म्हणून बूस्टर लस घेण्याचा सल्ला देत आहेत. लसीचा प्रभाव कालांतराने कमी होऊ शकतो.

चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?

२. मास्क घालायला हवा का?

"आम्ही मास्क वापरण्याची शिफारस करतो, विशेषतः गर्दीच्या ठिकाणी. तुम्हाला कोणत्याही गंभीर आजाराने ग्रासलं असेल किंवा तुमची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तरीही तुम्ही मास्क घालायला हवा" असं डॉ. बुद्धिराजा यांनी म्हटलं आहे. 

३. हा कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आहे का?

डॉ. सायमन ग्रँट यांच्या मते, 'सिंगापूर आणि हाँगकाँगसह आशियातील काही भागांमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या रुग्णसंख्येत वाढ ही मुख्यतः JN.1 व्हेरिएंट आणि त्याचे सब व्हेरिएंट जसं की LF.7 आणि NB.1.8, यामुळे झाली आहे.' JN.1 हा व्हेरिएंट ओमायक्रॉन BA.2.86 व्हेरिएंटचा सब व्हेरिएंट आहे आणि ऑगस्ट २०२३ मध्ये अमेरिकेत पहिल्यांदा आढळून आला. BA.2.86 मोठ्या प्रमाणात पसरला नसला तरी JN.1 ने जास्त संसर्गजन्यता दर्शविली आहे.

 बूस्टर डोस घ्यावा लागेल का? चीन आणि भारतासह ५ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका

४. भारताला जेएन-१ पासून धोका आहे का?

डॉ. बुद्धिराजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, घाबरून जाण्याची गरज नाही. भारतात अजूनही रुग्णांची संख्या कमी आहे आणि बहुतेक रुग्ण सौम्य आहेत. पण पुन्हा कोरोनाचा प्रसार होणं हे कोरोना अजून संपलेला नाही हे सांगत आहे. रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असणाऱ्या लोकांना याचा धोका आहे.  

५. वारंवार हात धुणं आवश्यक आहे का?

"ही घाबरण्याची गरज नाही, तयारी करण्याची आहे. बाहेरून आल्यानंतर घरी हात धुणं ही एक चांगली सवय आहे आणि तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की कोरोनामुळे लोकांचा स्वच्छतेकडे कल आणखी वाढला आहे. म्हणून, जेव्हाही तुम्ही बाहेरून घरी याल तेव्हा खबरदारी म्हणून हात धुत राहा" असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. 

धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

६. JN.1 किती संसर्गजन्य?

कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ प्रामुख्याने JN.1 व्हेरिएंटमुळे झाली आहे, जो ओमायक्रॉन BA.2.86 व्हेरिएंटचा वंशज आहे. JN.1 त्याच्या मूळ स्ट्रेनपेक्षा वेगाने पसरतो. हा व्हायरस पूर्वीच्या कोरोना व्हेरिएंटसारखाच पसरतो. WHO च्या मते, JN.1 व्हेरिएंटमध्ये सुमारे ३० म्यूटेशन  आहेत आणि त्यापैकी LF.7 आणि NB.1.8 हे अलिकडेच नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये २ सर्वात कॉमन व्हेरिएंट आहेत.

७. प्रत्येक व्यक्तीला धोका आहे का?

डॉ. सायमन यांच्या मते, कोणालाही संसर्ग होऊ शकतो, परंतु उच्च जोखीम गट, जसं की वृद्ध आणि ज्यांना आधीच आरोग्य समस्या आहेत किंवा ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, ते सहसा गंभीर आजारांना बळी पडतात. सिंगापूरसारख्या भागात जिथे संसर्गाचे प्रमाण वाढत आहे, आरोग्य अधिकारी विशेषतः या लोकांना बूस्टर शॉट्स घेण्याची शिफारस करत आहेत.

टॅग्स : कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसभारत