Join us

कॉफीला येते कचऱ्याची दुर्गंधी, कोरोना झालेल्यांच्या वासाचे तंत्र अजूनही बिघडलेलेच, अभ्यासक तर सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2022 13:33 IST

लंडनमध्ये केलेल्या संशोधनानंतर संशोधकांनी काढला निष्कर्ष

ठळक मुद्दे अशाप्रकारचा वास येणारे रुग्ण पुढील काही दिवस कॉफीचा आस्वाद घेऊ शकणार नाहीत हेही तितकेच खरे. कॉफीबरोबरच चॉकलेट, कांदा, लसूण, अंडे, मिटं आणि टूथपेस्ट यांसारख्या गोष्टींमध्ये असलेल्या केमिकलला अशाप्रकारचा घाण वास येतो

कोरोनाचा विषाणू जगभरात थैमान घालत असताना या आजाराने अनेकांची जीव घेतला आहे. आजाराच्या लक्षणांमधील एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे वास जाणे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये वास न येणे हे लक्षण प्रामुख्याने दिसून येत आहे. तर कोरोनातून बरे झालेल्यांमध्येही बरीच लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे प्रत्येकामध्ये वेगळी असली याबाबत अद्यापही बरेच संशोधन सुरू आहे. लंडनमध्ये जर्नल कम्युनिकेशन मेडिसिनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अभ्यासात कोवीडमध्ये व्यक्ती आपल्या ओळखीचे वास विसरतो असे म्हणण्यात आले आहे. इतकेच नाही तर कॉफीचा वास कोवीड झालेल्यांना कचऱ्यासारखा येतो असे एक महत्त्वाचे निरीक्षण यामध्ये नोंदविण्यात आले आहे. 

(Image : Google)

या प्रयोगासाठी काही कोवीड झालेल्या आणि न झालेल्या व्यक्तींना कॉफीचा वास घेण्यासाठी सांगण्यात आले. त्यावेळी कोवीड न झालेल्या व्यक्तींना कॉफीचाच वास आला तर कोवीड झालेल्यांना हा वास अतिशय घाण, कचऱ्यासारखा येत असल्याचे सांगितले. कॉफीमध्ये वास येणारा जो घटक असतो त्याचा हा वास असल्याचे सांगण्यात येत आहे. या लोकांना नंतर कॉफीचा वास निर्माण करणाऱ्या केमिकल्सचा वास देण्यात आला. तेव्हा यातील सर्वाधिक लोकांनी एक विशिष्ट केमिकल उचलून त्याला कचऱ्यासारखा वास येत असल्याचे सांगितले. 

(Image : Google)

कॉफीबरोबरच चॉकलेट, कांदा, लसूण, अंडे, मिटं आणि टूथपेस्ट यांसारख्या गोष्टींमध्ये असलेल्या केमिकलला अशाप्रकारचा घाण वास येत असल्याची नोंद करण्यात आली आहे. या पदार्थांमध्ये असलेले केमिकल वासाचा त्रास होण्यासाठी कारणीभूत असल्याचे यामध्ये म्हणण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना झालेल्यांना कॉफीला कचऱ्याचा वास येत असेल तर तो कोरोनाचा साईड इफेक्ट आहे असे म्हणायला हरकत नाही. मात्र अशाप्रकारचा वास येणारे रुग्ण पुढील काही दिवस कॉफीचा आस्वाद घेऊ शकणार नाहीत हेही तितकेच खरे. 

टॅग्स : आरोग्यकोरोना वायरस बातम्याहेल्थ टिप्स