पोट फुगल्यासारखं वाटणं, घट्टपणा जाणवणं, कपडे अचानक घट्ट व्हायला लागणं किंवा जेवल्यानंतर अस्वस्थता जाणवणं या समस्या ब्लोटींगमुळे होतात. ही समस्या आजकाल अनेकांना जाणवते, विशेषतः बदललेल्या आहारपद्धती आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे. ब्लोटींग एखाद्या आजारपणाचे लक्षणं नसून बहुतांश वेळा पचनाशी संबंधित तक्रार असते.(Bloated belly? What causes this unbearable problem of 'bloating'? See what the solution is) पोटात वायू साचणं, अन्न नीट न पचणं किंवा आतड्यांची हालचाल मंदावणं यामुळे ही समस्या निर्माण होते.
ब्लोटींग होण्यामागे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अन्न पचण्याची प्रक्रिया बिघडणं. घाईत जेवण्याची सवय, अन्न नीट न चावता गिळण्याची सवय किंवा खाताना बोलण्याची सवय यामुळे जास्त हवा पोटात जाते आणि त्यामुळे पोट फुगल्यासारखं वाटू लागतं. सतत बाहेरचं, जास्त तेलकट आणि प्रक्रिया केलेलं अन्न खाल्ल्यामुळे पचनसंस्था थकते. काही लोकांना दूध किंवा दुधाचे पदार्थ पचत नाहीत, तर काहींना गहू, मैदा किंवा काही कडधान्यांमुळे पोट फुगतं. महिलांमध्ये हार्मोन्समधील बदल, मासिक पाळीच्या आधी किंवा ताणतणावाच्या काळात ब्लोटींग अधिक जाणवू शकतं.
काही पदार्थ असे असतात जे पोटात जास्त वायू निर्माण करतात आणि त्यामुळे ब्लोटींग वाढतं. फार तिखट, मसालेदार आणि तेलकट पदार्थ पचनसंस्थेला जड जातात. मैद्याचे पदार्थ, ब्रेड, बिस्किटं, केक यांसारखे पदार्थ पचायला वेळ घेतात आणि पोटात जडपणा जाणवतो. कार्बोनेटेड ड्रिंक्स, थंड पेय, सोडा यामुळे पोटात हवा साचते. कांदा, फुलकोबी, कोबी, हरभरा, राजमा यांसारखे काही पदार्थ पोटात वायू निर्माण करतात, विशेषतः ते नीट शिजवलेले नसतील तर. जास्त साखर, कृत्रिम गोड पदार्थ यामुळे ब्लोटींग वाढतं.
याउलट काही पदार्थ असे असतात जे पचन सुधारण्यास मदत करतात आणि पोट फुगण्याची तक्रार कमी करतात. कोमट पाणी पिण्याची सवय असेल तर पचनक्रिया सुरळीत होते. भात, डाळींचं पातळ वरण, दोडकं, दुधी भोपळा, गाजर, पडवळ यांसारख्या हलक्या भाज्या पचायला सोप्या असतात. ताक किंवा पातळ दही योग्य प्रमाणात घेतल्यास आतड्यांमधील चांगले जंतू वाढतात आणि गॅस कमी होतो. आल्याचा काढा, गरम जिरं पाणी किंवा थोडं हिंग टाकलेलं अन्न पचनासाठी उपयोगी ठरतं.
आहाराबरोबरच खाण्याच्या सवयींचाही ब्लोटींगवर मोठा परिणाम होतो. ठराविक वेळेला जेवण करणं, अन्न शांतपणे आणि नीट चावून खाणं महत्त्वाचं आहे. जेवणानंतर लगेच झोपणं किंवा बसून राहणं टाळावं. थोडं चालणं पचनासाठी फायदेशीर ठरतं. ताणतणाव, चिंता आणि अपुरी झोप यामुळेही पचनसंस्था बिघडते आणि ब्लोटींगची तक्रार वाढते.
ब्लोटींग ही बहुतांश वेळा आहार आणि जीवनशैलीशी निगडित समस्या असते. कोणते पदार्थ आपल्याला मानवतात आणि कोणते त्रास देतात हे ओळखणं गरजेचं आहे. जड, प्रक्रिया केलेल्या पदार्थांऐवजी हलकं, घरचं आणि ताजं अन्न निवडलं, तसेच पचनाला पोषक पदार्थांचा समावेश केला, तर पोट फुगण्याची समस्या हळूहळू आटोक्यात येऊ शकते.
