सध्याची बदललेली लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोटात गॅस, ॲसिडीटी होणे या फारच कॉमन समस्या झाल्या आहेत. गॅस झाल्यावर फक्त पोटात दुखणे, जळजळ होणे किंवा ढेकर येणे इतकाच त्रास होत नाही, तर रात्री शांत झोप लागणे देखील कठीण होऊन जाते. अनेकदा बऱ्याचजणांना रात्रीच्या वेळी पचनाशी (best sleeping position for gas relief) संबंधित समस्या आणि पोटात गॅस, ॲसिडीटी होणे अशा आरोग्याच्या अनेक समस्या सतावतात. दिवसा जर अशी समस्या झाली तर आपण काही ना काही उपाय करुन रिलॅक्स होतो, परंतु रात्रीच्या वेळी जर गॅस, ॲसिडीटी झाली तर झोप लागणे अवघड होऊन जाते(how to sleep when you have gastric problem).
रात्री झोपताना (sleep positions to reduce bloating and gas) तुमची पोटाची स्थिती योग्य नसेल तर मिनिटभरही झोप लागणं अशक्यचं... अशावेळी औषधं किंवा इतर घरगुती उपायांसोबतच आपल्या झोपेची पोझिशन बदलली तरी मोठा (how to get rid of gas while sleeping) फरक जाणवू शकतो. योग्य झोपेची स्थिती पोटातील गॅस नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत करते आणि आरामदायक झोप लागते. मेट्रो हॉस्पिटल, नोएडा येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, डॉ. हर्ष कपूर यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत, गॅस झाल्यावर झोपण्याची योग्य स्थिती कोणती असावी याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
गॅस झाल्यावर शांत आणि आरामदायक झोप येण्यासाठी झोपण्याची कोणती पोझिशन सर्वात उत्तम आहे, या 'पोझिशन'मागील शास्त्रीय कारण काय आहे आणि झोपताना कोणत्या चुका टाळायच्या, याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात. कारण झोपेची योग्य पद्धत गॅसपासून आराम मिळवण्यासाठी एक 'नैसर्गिक उपाय' ठरू शकते!
पोटात गॅस झाल्यावर शांत झोपेसाठी कोणती पोझिशन योग्य...
डॉ. हर्ष कपूर यांच्या मते, रात्रीच्या वेळी पोटातील गॅसच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी डाव्या कुशीवर झोपणे फायदेशीर ठरते. डाव्या बाजूला झोपल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते, कारण गुरुत्वाकर्षणामुळे अन्न आणि ॲसिड योग्य दिशेने पुढे सरकते. डाव्या कुशीवर झोपणे हा एक महत्त्वाचा उपाय आहेच, पण त्याव्यतिरिक्तही झोपण्यापूर्वी काही गोष्टी केल्यास गॅसचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
डाव्या कुशीवर झोपल्याने पचनाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. याचबरोबर, पोटातील गॅस ढेकर किंवा इतर मार्गांनी बाहेर काढण्यास मदत मिळते. पोट फुगण्याची समस्या कमी होते. यामुळे पचनक्रियेला देखील चालना मिळते. डाव्या कुशीवर झोपणे हा गॅस आणि पचनाच्या समस्यांवरचा एक नैसर्गिक आणि फायदेशीर उपाय आहे.
झोपण्यापूर्वी करता येतील असे काही इतर उपाय...
१. डोकं थोडं उंचावर ठेवून झोपा :- रात्रीच्या वेळी गॅस आणि ॲसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी झोपताना डोक्याकडील भाग थोडा उंचावर ठेवणे खूप फायदेशीर ठरते. असे केल्याने गॅस, ॲसिडिटी, छातीत जळजळ, ॲसिड रिफ्लक्स अशा समस्यांचा त्रास कमी होतो. डोक्याकडील भाग उंच ठेवल्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या नियमांनुसार पोटातील ॲसिड आणि गॅस अन्ननलिकेकडे परत येणे थांबते. यामुळे छातीत होणारी जळजळ कमी होते आणि शांत झोप लागते.
२. वॉकिंग करणे :- रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नका. जेवणानंतर सुमारे १५ ते २० मिनिटे फेरफटका मारल्यास पचनक्रिया गतिमान होते आणि पोटात गॅस साचून राहण्याची शक्यता कमी होते.
३. रात्री हलका आहार घ्यावा :- रात्रीच्या वेळी हलका आहार घ्या आणि झोपण्यापूर्वी २ ते ३ तास आधी जेवण पूर्ण करा. हलका आहार सहजपणे आणि जलद पचतो. यामुळे पचन प्रक्रिया सुधारते. परिणामी, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून बचाव करण्यास मदत मिळते. रात्री पचनास जड, तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यास पोटावर ताण येतो. त्याऐवजी, साधे, कमी तेलकट आणि लवकर पचणारे अन्नपदार्थ खाणे पोटातील गॅसची समस्या टाळण्यासाठी सर्वोत्तम आहे.
४. पोटावर झोपणे टाळा :- रात्री जास्त जेवण केल्यानंतर आणि विशेषतः पोटावर झोपणे कटाक्षाने टाळले पाहिजे. पोटावर झोपल्याने पोटावर अनावश्यक दाब पडतो. या दाबामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि ॲसिड रिफ्लक्स यांसारख्या पचनाशी संबंधित समस्या वाढू शकतात. पोटावर दाब पडल्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि गॅस निर्माण होतो, जो अन्ननलिकेकडे ढकलला जाऊ शकतो, ज्यामुळे छातीत जळजळ होते. त्यामुळे, पचनाच्या समस्या टाळण्यासाठी आणि शांत झोपेसाठी, रात्री कधीही पोटावर झोपू नका. त्याऐवजी, डाव्या कुशीवर झोपणे अधिक फायद्याचे ठरेल.
५. जेवण आणि झोपेत अंतर :- झोपण्यापूर्वी कमीतकमी दोन ते तीन तास आधी जेवण करावे. यामुळे पोटाला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि छातीत जळजळीचा त्रास कमी होतो.