'कांदा' फक्त अन्नपदार्थांची चव वाढवण्याचेच काम करत नाही, तर आरोग्यासाठी देखील तो खूपच फायदेशीर असतो. आपल्या आजी-आजोबांच्या काळापासून विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी तळपायाखाली कांद्याची चकती ठेवण्याची पद्धत ही आरोग्याच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणून काम करते. हा उपाय ऐकून थोडा विचित्र वाटू शकतो, पण आयुर्वेदानुसार आणि काही नैसर्गिक उपचार पद्धतींनुसार, कांद्यातील सल्फर संयुगे, अँटीबॅक्टेरियल आणि डिटॉक्सिफायिंग गुण शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यात मदत करतात.
एरवी आपण कांदा फक्त पदार्थांतच वापरतो पण, कांद्यातील अनेक औषधी गुणधर्म आरोग्याच्या अनेक समस्यांवर गुणकारी ठरतात. आहारतज्ज्ञ श्रेया गोयल यांनी कांद्याचे तुकडे पायाखाली ठेवून झोपल्याने शरीराला नेमके कोणते फायदे मिळतात या विषयावर अधिक माहिती दिली आहे. कांद्याची इवलीशी चकती रात्रभर तळपायाशी ठेवून झोपल्याने नेमके कोणते कायदे होतात ते पाहूयात.
कांद्याची इवलीशी चकती करेल कमाल...
१.डिटॉक्सिफिकेशन :- रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यावर कांद्याचा तुकडा ठेवून मोजे घालणे हा एक पारंपरिक घरगुती औषधी उपाय आहे. या उपायामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते. शरीराला डिटॉक्स (विषारी घटक बाहेर काढण्यास) मदत मिळू शकते. सर्दी-खोकला यांसारख्या संसर्गांपासून बचाव होऊ शकतो. कांद्यातील फॉस्फोरिक अॅसिड त्वचेतून शोषले जाऊन रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करते आणि रक्तातील विषारी घटक आणि अशुद्धी बाहेर काढण्यास मदत करते, ज्यामुळे रक्त शुद्ध होते असे मानले जाते.
२. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी :- तळपायाखाली कांद्याचे तुकडे ठेवून झोपल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. कांद्यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.
३. सर्दी कमी करण्यासाठी :- झोपण्यापूर्वी तळपायांवर कांदा ठेवणे हा एक पारंपरिक उपचार आहे, जो सर्दी कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. यासाठी कांदा कापून पायांच्या तळव्यावर ठेवून मोजे घालून रात्रभर ठेवला जातो, कारण कांद्यात नैसर्गिक कुलिंग गुणधर्म असतात आणि त्यात काही विशिष्ट संयुगे असतात जे सर्दीचे प्रमाण कमी कारण्यासाठी फायदेशीर ठरतात.
४. त्वचेसाठी फायदेशीर :- झोपण्यापूर्वी तळपायांखाली कांद्याचे तुकडे ठेवणे त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे त्वचा मऊ आणि हायड्रेटेड राहते. हा उपाय त्वचेला नैसर्गिक ओलावा देतो आणि रुक्षपणा कमी करतो.
५. बॅक्टेरिया मारणे :- पायांच्या तळव्यामध्ये असलेल्या 'मेरिडियन पॉईंट्स' द्वारे कांद्यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म शरीरात प्रवेश करतात आणि शरीरातील बॅक्टेरिया आणि जंतूंना नष्ट करतात.
६. पायांचा दुर्गंध कमी करणे :- तळपायांशी कांद्याची चकती ठेवण्याच्या या उपायाने पायांमधील जंतू आणि बुरशी मुळापासून काढून टाकतो, ज्यामुळे दुर्गंध कमी होण्यास मदत होते.
ओनियन थेरपी कशी करावी ?
एक सेंद्रिय आणि मध्यम आकाराचा कांदा घ्या. लाल किंवा पांढरा कोणताही कांदा चालेल. कांदा धुवा आणि त्याची जाड चकती किंवा पातळ तुकडा कापून घ्या. कांद्याचा तुकडा जास्त मोठा नसावा, पण तो तळपायाच्या मध्यभागी येईल इतपत असावा. रात्री झोपण्यापूर्वी, कांद्याचा कापलेला तुकडा आपल्या पायाच्या तळव्याच्या मध्यभागी (ज्या भागाला मेरिडियन पॉईंट्सचे केंद्र मानले जाते) ठेवा. कांद्याचा तुकडा योग्य जागी राहावा यासाठी लगेच स्वच्छ आणि आरामदायक पायमोजे घाला. रात्रभर तसेच ठेवून शांत झोपा. सकाळी उठल्यावर कांद्याचा तुकडा काढून टाका आणि पाय स्वच्छ धुवा.
