सध्याच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये आपल्याला आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यास पुरेसा वेळच मिळत नाही. स्वतःकडे वेळीच योग्य लक्ष न दिल्याने आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सगळ्या समस्यांपैकीच रात्रीच्या वेळी झोप न लागण्याची ही समस्या फारच कॉमन आहे. आपल्यापैकी बरेचजण असे आहेत की, ज्यांना उशीवर डोकं टेकवल्यावर तासंतास झोपच येत नाही. रात्री झोप न आल्यामुळे तासंतास उलटसुलट होत पडावं लागतं आणि सकाळी उठल्यावरही फ्रेश वाटत नाही…अशी समस्या अनेकांना येते. अशा परिस्थितीत, साहजिकच मनात पहिला विचार येतो तो म्हणजे स्लीपिंग पिल्स घेण्याचा, परंतु दीर्घकाळ अशा प्रकारे स्लीपिंग पिल्स घेतल्यास त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो(The Natural Sleep Drink)
रात्रीची शांत व सुखकारक तसेच अंथरुणात पडल्या पडल्या झोप लागावी यासाठी नैसर्गिक उपाय करणेच फायदेशीर ठरते. अलीकडेच मुंबईच्या सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट आणि Eatfit24/7 च्या संस्थापक श्वेता शाह यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी स्लीपिंग पिल्सशिवाय चांगली झोप येण्यासाठी एका खास घरगुती ड्रिंकची रेसिपी सांगितली आहे. रात्री झोपण्यापूर्वी हे ड्रिंक प्यायल्याने कोणत्याही दुष्परिणामाशिवाय आपल्याला अंथरुणात पडल्या पडल्या लगेच झोप लागेल.
रात्री शांत व गाढ झोप येण्यासाठी कोणतं ड्रिंक पिणं फायदेशीर...
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांच्या मते, हे ड्रिंक तयार करण्यासाठी आपलयाला २ टेबलस्पून बडीशेप, ४ बदाम, १ टेबलस्पून खसखस, १/२ टेबलस्पून खडीसाखर, वेलची ३ ते ४, काळीमिरी २ ते ३ दाणे, जायफळ पूड १/२ टेबलस्पून, काळी किशमिश ४ ते ५, केशर १/२ टेबलस्पून इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
शांत व गाढ झोप येण्यासाठी हे स्लिप ड्रिंक कसे तयार करावे ?
सर्व साहित्य (वरील घटक) एकत्र करा आणि ते मिक्सर किंवा ग्राइंडरमध्ये घालून त्याची बारीक पावडर तयार करा. ही पावडर एका स्वच्छ, हवाबंद डब्यात भरून ठेवा. हे मिश्रण तुम्हाला दोन ते तीन आठवड्यांपर्यंत सहज पुरेल.
याचा वापर कसा करावा ?
१. रात्री झोपण्यापूर्वी लगेच, या तयार मिश्रणाचा अर्धा छोटा चमचा घ्या आणि तो एक कप गरम दुधात मिसळा.
२. हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिसळा आणि त्याचे हळूहळू घोट घेत ते प्या.
३. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही यात एक थेंब देशी तूप देखील मिसळू शकता.
४. यामुळे शरीराला आणखी जास्त आराम मिळतो.
चटकन झोप लागण्यासाठी हे ड्रिंक कसे फायदेशीर असते ?
१. हे घरगुती व नैसर्गिक ड्रिंक प्यायल्याने डोक्यातील अतिविचार आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत मिळते.
२. यातील खसखस, बदाम, आणि जायफळ यांसारखे घटक मेंदूला शांत करतात, ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते.
३. याशिवाय बडीशेप, वेलची आणि काळीमिरी हे घटक पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
