Home remedies lungs mucus : थंडीच्या दिवसात वातावरण बदल आणि थंडीमुळे कोरड्या खोकल्यासोबतच अनेकांना कफचा त्रास होतो. छातीत चिकटून बसलेला कफ बाहेर पडत नसल्याने खोकून खोकून छातीही दुखायला लागते. जर आपल्यालाही नेहमीच कफ होत असेल आणि यासाठी आपल्याला औषध किंवा सिरप घ्यायचं नसेल तर काही सोप्या आयुर्वेदिक उपायांनी आराम मिळवू शकता. हे उपाय करून छातीतील जमा कफ तर बाहेर पडेलच, सोबतच खोकला आणि सर्दी देखील कमी होईल. चला तर पाहुयात काय आहेत हे उपाय आणि कसे मिळतात त्यांचे फायदे...
आले आणि मध
एक चमचा मधात थोडं किसलेलं आलं मिक्स करा. कफ बाहेर काढण्यासाठी हे मिश्रण खाऊ शकता. जर आपण थेट हे मिश्रण खाऊ शकत नसाल, तर हे मिश्रण पाण्यात टाकूनही पिऊ शकता. आले आणि मधातील अनेक पोषक तत्व छातीत जमा झालेला कफ बाहेर पाडण्यास फायदेशीर ठरतात. थंडीच्या दिवसात तर हा उपाय सगळ्यात प्रभावी ठरतो. याने घशाला शेकही मिळतो. सोबतच पोटासंबंधी अनेक समस्याही दूर होतात.
काळी मिरी पूड आणि हळदीचं दूध
एक ग्लास गरम दूध घ्या. त्यात एक चमचा हळद आणि चिमुटभर काळी मिरी पूड मिक्स करा. कफचा त्रास दूर करण्यासाठी हा एक रामबाण उपाय ठरू शकतो. हिवाळ्यात हळद घातलेलं दूध आणि काळी मिरी पूड एकंदर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीही फायदेशीर ठरते
मध आणि काळी मिरी
दोन्हींमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात. सगळ्यात आधी एक चमचा मध घ्या. मधात चिमुटभर काळी मिरी पूड टाकून मिक्स करा. औषधी गुणांनी भरपूर असलेल्या या मिश्रणाने घशाला खूप आराम मिळतो. कफही बाहेर पडतो. जर हे उपाय करूनही छातीत जमा कफ बाहेर पडत नसेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.
गूळ, वेलची, काळी मिरीचं खास पाणी
एका भांड्यामध्ये अर्धा कप पाणी घ्या. त्यात १ चमचा गूळ, अर्धा चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा ओवा पावडर, अर्धा चमचा काळे मिरे पावडर आणि अर्धा चमचा काळं मीठ टाका. हे मिश्रण गॅसवर २ मिनिटे गरम करा. हे अर्धा चमचा मिश्रण रोज सकाळी आणि सायंकाळी कोमट पाण्यात टाकून सेवन करा. कोरडा खोकला आणि कफ लगेच दूर होईल.
