प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता 'अभय देओल' त्याच्या हटके भूमिकांसाठी ओळखला जातो, पण गेल्या काही काळापासून तो पडद्यामागे एका तीव्र वेदनादायी आजाराशी लढा देत होता. 'सायटिका' (Sciatica) या आजारामुळे होणाऱ्या असह्य त्रासावर त्याने अखेर मात केली आहे आणि तीही एका आधुनिक उपचार पद्धतीद्वारे! अभय देओलने स्वतः सोशल मिडियावर आपला अनुभव शेअर करत 'स्टेम सेल थेरपी'ने त्याचे आयुष्य कसे बदलले, हे सांगितले आहे. सायटिकाचा हा त्रास नेमका काय असतो आणि अभयने वापरलेली ही नवीन उपचार पद्धती किती फायदेशीर आहे ते पाहूयात...(Abhay Deol's Sciatica Treatment Journey).
सायटिकाच्या वेदनांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी अभिनेता अभय देओलचा अनुभव एक आशेचा किरण ठरत आहे. 'सायटिक नर्व्ह'वर येणाऱ्या दाबामुळे होणारा हा त्रास कधीकधी (Abhay Deol stem cell therapy sciatica) चालणे-फिरणे देखील कठीण करतो. अभय देओलने यावर 'स्टेम सेल थेरपी'चा (Stem Cell Therapy) आधार घेऊन नैसर्गिकरीत्या पेशींची दुरुस्ती कशी करता येते, याबद्दल अधिक माहिती सांगितली आहे.
सायटिका म्हणजे नेमकं काय ?
'सायटिका' हा कोणताही एक असा स्वतंत्र आजार नसून, तो 'सायटिक नर्व्ह' (Sciatic Nerve) या मज्जातंतूवर येणाऱ्या दाबामुळे उद्भवणाऱ्या वेदना आहेत. सायटिक नर्व्ह ही मानवी शरीरातील सर्वात लांब नस आहे, जी कंबरेच्या खालच्या भागातून सुरू होऊन दोन्ही पायांच्या टाचेपर्यंत जाते. जेव्हा या नसेवर कोणत्या कारणाने अतिरिक्त दाब येतो, तेव्हा कंबरेपासून पायापर्यंत तीव्र कळा वारंवार येतात. अभयने दक्षिण कोरियातील 'लिडियन क्लिनिक' (Lydian Clinic) येथे 'स्टेम सेल थेरपी' घेण्याचा निर्णय घेतला. अभय आता उपचारांच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा कोरियाला गेला आहे.
सायटिकाची प्रमुख लक्षण कोणती ?
१. तीव्र वेदना :- कंबरेपासून सुरू होऊन ही वेदना नितंब आणि मांड्यांवाटे थेट पायाच्या खालच्या भागापर्यंत जाते.
२. मुंग्या येणे :- पायांमध्ये वारंवार मुंग्या येतात किंवा पाय बधिर झाल्यासारखा वाटतो.
३. कमकुवतपणा :- पाय उचलण्यास किंवा चालण्यास अडथळा निर्माण होतो.
४. झिणझिण्या :- बसताना किंवा उठतांना पाठीत विजेचा करंट लागल्यासारख्या तीव्र झिणझिण्या येतात.
विराट कोहलीच्या फिटनेस ट्रेनरने सांगितल्या ५ गोष्टी, बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे उपाय...
सायटिका होण्याची मुख्य कारणे कोणती ?
१. स्लिप डिस्क :- कण्याच्या दोन मणक्यांमधील चकती (Disc) बाहेर सरकल्यामुळे सायटिक नर्व्हवर दाब येतो.
२. स्पाइनल स्टेनोसिस :- वाढत्या वयानुसार पाठीच्या कण्यातील नसांची जागा अरुंद होणे.
३. चुकीची लाईफस्टाईल :- तासंतास एकाच जागी बसणे, चुकीच्या पद्धतीने जड वस्तू उचलणे किंवा व्यायाम न करणे.
४. इजा :- अपघात किंवा पडल्यामुळे पाठीच्या कण्याला मार लागणे.
स्टेम सेल थेरपी म्हणजे नेमकं काय ?
अभय देओलने 'स्टेम सेल थेरपी' या थेरपीच वापर करून आपल्या पाठीच्या कण्यातील वेदनांवर यशस्वीरीत्या उपचार केले आहेत. या पद्धतीत शरीरातील अशा जिवंत पेशींचा (Stem Cells) वापर केला जातो, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या पेशींमध्ये रूपांतरित होण्याची क्षमता असते. जेव्हा हे सेल्स शरीरातील खराब झालेल्या भागात (उदा. मणक्यातील चकती किंवा नसेचा भाग) सोडले जातात, तेव्हा ते तिथे जाऊन नैसर्गिकरित्या नवीन आणि निरोगी पेशी तयार करतात.स्टेम सेल थेरपी मध्ये बाहेरील कृत्रिम गोष्टींऐवजी शरीरातील नैसर्गिक पेशींचा वापर करून आजार मुळापासून बरा करण्याचा प्रयत्न केला जातो.
पारंपारिक शस्त्रक्रियेमध्ये फार वेदना होतात आणि ऑपरेशन करण्यासाठी शरीराची हेळसांड करावी लागते, परंतु याउलट स्टेम सेल थेरपीमध्ये नैसर्गिकरित्या पेशींची दुरुस्ती केली जात असल्याने शस्त्रक्रियेशिवाय आराम मिळणे शक्य होते. यामध्ये मोठी शस्त्रक्रिया करावी लागत नसल्यामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता कमी असते. या प्रक्रियेमुळे नसेवर आलेली सूज कमी होते, ज्यामुळे कंबरेपासून पायापर्यंत जाणारी वेदना थांबते.
