अनेकांना अंगावर उष्णता उठते. अशी तक्रार करतात. याचा अर्थ शरीरातील अंतर्गत उष्णता वाढलेली असते. ही उष्णता तापासारखी बाहेरुन मोजता येत नाही, पण शरीरात जळजळ, अस्वस्थपणा, घाम जास्त येणे, तोंडाला कोरडेपणा, पोटात जळजळ, लघवीत जळजळ, त्वचेवर पुरळ किंवा चेहऱ्यावर फोड येणे यातून सुरु होते. (A different problem occurs when the body temperature increases, see how to deal with skin problems )उष्णतेचा आणि पित्ताचा त्रास असणाऱ्यांना अपचन झाल्यावर उलटी होते किंवा डोकं दुखतं. पण काहींच्या पित्त अंगावर दिसतं. त्यालाच उष्णता उठणे किंवा पित्त उठणे असे म्हटले जाते. लालसर बारीक पुरळ असते. त्याला असह्य खाज सुटते आणि दाह होत राहतो.
अंगावर उष्णता उठण्यामागे पचन बिघडणे हे एक महत्त्वाचे कारण असते. जड, तिखट, तेलकट पदार्थ जास्त खाल्ले की शरीरात उष्णता वाढते. तसेच सतत उन्हात राहणे, झोपेचा अभाव, मद्यपान, सिगारेट, जास्त चहा-कॉफी यामुळेही शरीरात उष्णता वाढते. काही वेळा हार्मोन्समधील बदल, औषधांचा परिणाम किंवा दीर्घकाळ चाललेली बद्धकोष्ठता यामुळेही अंगावर उष्णता उठू शकते.
या उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी आहारात आणि दिनचर्येत बदल करा. थंडावा देणारे पदार्थ आहारात असणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरपूर पाणी पिणे. पाणी शरीरातील उष्णता बाहेर काढण्यास मदत करते. त्यासोबत ताक, लिंबूपाणी, नारळपाणी यांसारखी पेये उपयुक्त ठरतात. मसालेदार, तिखट, फार तेलकट पदार्थ काही काळ टाळावेत आणि हिरव्या भाज्या, फळे, पातळ वरण, वरण-भात असा हलका आहार घ्यावा.
कोकम आणि आमसुल हे अंगावर उठलेली उष्णता कमी करण्यासाठी फारच गुणकारी मानले जातात. कोकमामध्ये नैसर्गिक थंडावा देणारे गुणधर्म असतात. कोकमाचे पाणी किंवा कोकम सरबत घेतल्याने पोटातील जळजळ कमी होते, तहान भागते आणि शरीर शांत होते. आमसुल म्हणजे कोकमचाच वाळवलेला प्रकार असून तो पचन सुधारतो आणि शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करण्यास मदत करतो. जेवणात आमसुल घातल्यास आम्लपित्त, जळजळ आणि उष्णतेचा त्रास कमी होतो. अंगावर उष्णता उठल्यावर त्याला आमसुल चोळणे फायद्याचे ठरते. कोकमाचा अर्क लावाणे हा मस्त उपाय आहे.
याशिवाय धणे-जिरे भिजवून तयार केलेले पाणी, ताक, दुधात थोडी वेलची घालून पिणे, भिजवलेले बदाम किंवा मनुके खाणे हेही उपयोगी ठरते. त्वचेवर उष्णता जाणवत असल्यास थंड पाण्याने अंघोळ करणे, सूती कपडे घालणे आणि थेट उन्हात जाणे टाळणे आवश्यक आहे. ही उष्णता योग्य उपाय केल्यावर दिवसभरात कमी होते. पण नाहीच झाली तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
