चिवडा, लाडू, करंजी, चकली, शंकरपाळे, अनारसे असे पदार्थ एरवीही मिळतात. पण हे पदार्थ जेव्हा दिवाळीत केले जातात तेव्हा ते खाण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे या सगळ्याच पदार्थांवर आपण यथेच्छ ताव मारतो. दिवाळीत पाहुणे, मित्रमंडळीही घरी येतात. त्यांच्यासोबत गप्पा मारत जरा जास्तच फराळ केला जातो. खाताना लक्षात येत नाही, पण नंतर मात्र त्रास व्हायला लागतो. छातीत जळजळ व्हायला लागते. ॲसिडीटी वाढल्यासारखी वाटते. असं झालं तर नेमकं काय करायचं ते पाहा..(how to get rid of acidity?)
फराळाचे पदार्थ खाऊन ॲसिडीटी वाढली तर काय करावं?
१, ॲसिडीटी वाढली असेल तर घरच्याघरी कोणता उपाय करता येऊ शकतो याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी askhealthguru and dr_varun_ayurveda या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये डॉक्टर सांगतात की ज्येष्ठमधाची पावडर आणि बडिशेप सम प्रमाणात एकत्र करा आणि त्याच्या निम्म्या प्रमाणात खडीसाखरेची पावडर घ्या. ॲसिडीटी वाढल्यास हे मिश्रण थोडे थोडे खा. त्रास कमी होईल.
२. ॲसिडीटी वाढल्यास तेलकट, तुपकट, तिखट पदार्थ खाणं पुर्णपणे टाळा.
३. पाणी भरपूर प्रमाणात प्या. पाणी प्यायल्यानेही ॲसिडीटी कमी होण्यास मदत होईल.
४. काकडी खाल्ल्यानेही शरीरातली वाढलेली ॲसिडीटी कमी होते. काकडी बारीक चावून चावून खा. लगचेच बराच फरक जाणवेल.
५. ॲसिडीटी वाढल्यास एका जागी बसून राहू नका. मोकळ्या हवेत थोडं वॉकिंग करा. तसेच थंड गार दूध प्या. थंड दुधानेही छातीतली, पोटातली जळजळ कमी हाेते.